Rohit Pawar : आगामी निवडणुकीसाठी विरोधकांनी काय केलं पाहिजे? रोहित पवारांनी सांगितला अॅक्शन प्लान
आगामी निवडणुकीवर रोहित पवारांनी महत्वाचं भाष्य केलं. यावेळी विरोधकांनी काय करायला हवं, यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

देशासहित राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षाने आतापासून चाचपणी सुरू केली आहे. एकीकडे काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यानंतर शरद पवार गटानेही बैठकांचा धडाका लावला आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आगमी निवडणुकीवर मोठं भाष्य केलं.
रोहित पवार हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर समस्या मांडल्या. तसेच महावितरण ,वन्यप्राण्यांमुळे होणारा त्रास सांगितला. विशेष म्हणजे दुबार पेरणी करूनही पेरलेलं सोयाबीन पावसाअभावी वाया गेलं असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.. याच पिकांवर शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त असते, मात्र हे पीक गेल्याने काय पुढच काय करायचं असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांना 50 हजाराची हेक्टरी मदत देण्यात यावी आणि मजुरांना प्रति कुटुंब 25 हजार रुपयाची मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आगामी निवडणुकीवर रोहित पवार म्हणाले, ‘कुठलाही पक्ष हा आपला पक्ष कुठं कमकुवत आहे, याचा अभ्यास करावा लागतो. काँग्रेसकडून हा अभ्यास केला जात आहे. आमचाही सुरू आहे. महाराष्ट्रात शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी बैठका घेतल्या. त्यामुळे कमकुवत असू, ते नीट करणं गरजेचं आहे. इंडिया आघातील जे पक्ष आहेत. त्यांनी एकत्र येऊन तयारी ही आजपासून केली पाहिजे’.
वाशिममध्ये शेतकरी मोर्चा
रोहित पवार हे वाशिमच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान कारंजामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा होणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व हे रोहित पवार करणार आहेत. तसेच या मोर्चाआधी रोहित पवार हे पसरणी, धामणी या गावात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत. वाशिमध्ये ४५ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. यामुळे सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांना फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा वाशिम दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.