
नागपूर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाच्या प्रश्नी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीत 14 डिसेंबरला महत्वाची बैठक पार पडली होती. त्यामध्ये सीमावादावर चर्चा झाली होती, हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर भाष्य करू नका, कुठलाही वाद होणार नाहीत अशी भाष्य करू नका अशी चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दिली होती. त्यावेळी त्यावर कुठलाही आक्षेप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतला नव्हता. मात्र, कर्नाटकमध्ये जाताच बोम्मई हे दररोज नवनवीन विधाने करत आहे. त्यातच कर्नाटक विधानसभेत बसवराजबोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव दोन्ही सभागृहात केला जाईल अशी माहिती दिली. पण याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाविषयी चर्चाच झाली नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रकरणी चर्चा झाल्याचे बोम्मई यांनी म्हंटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक सभागृहात केलेले हे विधान घुमजाव करणारे होते का ? की खरंच अमित शाह यांच्याकडे झालेल्या बैठकीत अशी चर्चाच झाली नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सवाल उपस्थित केले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे झालेल्या बैठकीत कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाच्या प्रश्नावर जी चर्चा झाली त्यामध्ये सीमावादावर चर्चा झाली नाही असे बोम्मई म्हणत आहे तर मग खोटं कोण बोललं असा सवाल उपस्थित केला आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्ना संदर्भात नव्हतीच तर केवळ कायदा-सुव्यवस्थे संदर्भात असल्याचं सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? pic.twitter.com/QiU3SeWnNZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 21, 2022
रोहित पवार यांनी ट्विट मध्ये म्हंटलंय, केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्ना संदर्भात नव्हतीच तर केवळ कायदा-सुव्यवस्थे संदर्भात असल्याचं सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे.
आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात.
ते त्यांच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्राचे नेते ज्याप्रमाणे घाबरून आहेत, त्याप्रमाणे घाबरत नाहीत किंवा महाराष्ट्राच्या नेत्यांना जो केंद्रीय सपोर्ट नाही तो छुपा केंद्रीय सपोर्ट त्यांना आहे.
किंवा येणाऱ्या निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने ते भावनिक विषय छेडून आपली बाजू भक्कम करत आहेत. पण ते काही असो महाराष्ट्र मात्र महाराष्ट्र सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही,हे बोम्मई यांनी लक्षात घ्यायला हवे. असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.