रोहित पवार यांचा 6 बंडखोर खासदारांबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा, म्हणाले 80 ते 90 कोटी कॅश अन्.., चर्चेला उधाण

ऑपरेशन टायगरवर बोलताना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा बंडखोर खासदारांवर गंभीर आरोप केला आहे, तसेच राज्यात आता ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन तुतारीची देखील चर्चा सुरू झाली आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांचा 6 बंडखोर खासदारांबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा,  म्हणाले 80 ते 90 कोटी कॅश अन्.., चर्चेला उधाण
Rohit Pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 25, 2026 | 3:12 PM

शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या सात वरून वाढून तेरावर पोहोचली आहे. दरम्यान या बंडखोर खासदारांवर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली जे खासदार फुटले त्यांना 80 ते 90 कोटी कॅश व अडीचशे कोटींचा विकास निधी दिला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचा एकही आमदार, खासदार फुटणार नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  ते धाराशिवमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

ऑपरेशन टायगरच्या नावाखाली फुटलेल्या   सहा खासदारांना 80 ते 90 कोटी रुपयांची रोख कॅश व अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे,  राज्यातील भाजप व केंद्रातील भाजप यांच्यात वाद सुरू असून केंद्रातील भाजप हे एकनाथ शिंदे यांना बळ देत आहे, तर राज्यातील भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बळ देत आहे, फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची आडवणूक करत आहेत, असा दावा देखील यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.

ऑपरेशन टायगरनंतर आत राज्यात ऑपरेशन तुतारीची देखील चर्चा सुरू झाली आहे, दरम्यान यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून कोणता खासदार, आमदार फुटणार नाही असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. हे फक्त डी लिमिटेशनसाठी ऑपरेशन टायगरच्या नावाखाली ऑपरेशन बाजार मांडत असल्याचा आरोप देखील यावेळी रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी यापूर्वी देखील बंडखोर खासदारांबद्दल मोठा दावा केला होता.

Follow Us