Rohit Pawar : रोहित पवारांचा नको तोच निर्णय; पत्रावर नावाचा उल्लेख…
रोहित पवारांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका घेण्याची विनंती केली आहे. रोहित पवारांनी यावेळी पत्रात आमदार असल्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. इंडिया आघाडीतील काही पक्ष हे विधेयकांच्या बाजूने मतदान करण्याच्या स्थितीत आहेत. परंतु संसदेत विधेयक मांडणाच्या काहीतासाआधीच विरोधकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी देखील विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. परंतु यावरून पुरागोमी संघटनांकडून शरद पवारांच्या भूमिकेवर टीका केली जात आहे. यावरून रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून विधेयकांच्या विरोधात भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. रोहित पवारांनी पत्र लिहिताना स्वत:चा आमदार उल्लेख देखील केलेला नाही. त्यामुळे रोहित पवारांच्या पत्रावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
रोहित पवारांनी भलंमोठं पत्र खासदार सुप्रिया सुळे यांना लिहिलं आहे. रोहित पवारांनी यांनी पत्रातून पक्षातील खासदार सुळे यांना पत्राच्या विरोधात भूमिका घेण्याची विनंती केली आहे. पत्रात त्यांनी स्वत:चा आमदार असा उल्लेख टाळला आहे. त्यांनी देशातील नागरिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता असा स्वत:चा उल्लेख केला आहे. आमदार असतानाही कार्यकर्ता असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रोहित पवारांचं पत्र जशेच्या तसं
भाजपकडून डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातोय वास्तविक महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक याचा काहीही संबंध नाही. २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेने मंजूर केलं असून आपल्या पक्षाने देखील या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या क्षणी देखील त्याची अंमलबजावणी करता येते, मग ती का केली जात नाही?
भाजपाचे अनेक नेते २०२४ मध्ये ४०० पार चा नारा देत संविधान बदलण्याची भाषा उघडपणे बोलत होते. या गोष्टी ध्यानात ठेवून देशातील जनतेने त्यांना गुडघ्यावर आणलं संविधान बदलण्याचा भाजपाचा मूळ अजेंडा अजूनही कायम असून त्यासाठीच डिलिमिटेशनच्या माध्यमातून असंविधानिक पद्धतीने आपल्या सोईचे मतदारसंघ बनवून संविधान बदलाचं आपलं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसतो. भाजपाला लोकशाही आणि संविधानाबाबत प्रेम आणि निष्ठा असेल तर डिलिमिटेशन कमिटीचं अध्यक्षपद हे विरोधी पक्षनेत्याला देणार का, याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि या उत्तरातूनच त्यांचा हेतू उघड होईल. अशा परिस्थितीत आपल्याच पक्षातील सत्तापिपासू खंडोजी खोपडे हे आपल्या मनात अनेक गोष्टी भरवत असावेत. ‘आर्थिक ताकद आणि सत्ता असल्याशिवाय निवडणुका जिंकायच्या तरी कशा? हा त्यांचा नेहमीचा युक्तीवाद असतो.
पण आपण याचा विचार करत बसलो तर सामान्य जनतेचे मुद्दे मांडायचे कुणी हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातली जनता स्वाभिमानी आणि महाराष्ट्र धर्माला जागणारी आहे. आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारी आहे, आपला पक्ष रस्त्यावर उतरून एक पाउल पुढं आला तर इथली जनता दहा पावलं नक्की पुढं येईल. त्यामुळं आपल्यातल्या खंडोजी खोपडे यांना हाताशी धरून भाजपाने हे षड्यंत्र स्वलं असलं तरी या पापात आपण का भागीदार व्हायचं? त्यामुळं डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा देण्याच्या चर्चेमुळं राज्यभरातील पुरोगामी विचारांना मानणारा मोठा वर्ग, आपले निष्ठावान मतदार आणि तळागाळातील कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि अस्वस्थ आहेत. दुःख याचं वाटतं की, याच संतापातून आणि नैराश्यातून आज तुमच्यासह आदरणीय पवार साहेबांवरही मोठ्या प्रमाणात टीका होतेय. ज्या नेत्याने आयुष्यभर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी, पुरोगामी विचारांसाठी रक्त आटवलं, त्या साहेबांवर अशी टीका होताना साहेब आजारी असल्याने स्वतः भूमिका मांडू शकत नाहीत आणि स्पष्टीकरणही देऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्यावर होणारी ही टीका पाहून माझ्याप्रमाणेच तुमच्याही मनाला वेदना होत असणार यात तिळमात्र शंका नाही.
“साहेब आजारी असताना, त्यांच्यामागं घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळं त्यांच्या आयुष्यभराच्या या तपाचा भंग होऊ नये, हीच माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांच्याच खांद्यावर आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही असं रोहित पवार म्हणालेत.
तसेच या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतच्या सध्या सुरु असलेल्या चर्चा बघितल्या तर आपल्याला देखील त्यासाठी जबाबदार धरलं जातंय. दुसरीकडं तुमचा चेहरा पुढं करून खऱ्या अथनि यामागे असलेला आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक नेता मात्र शांतपणे बसला असून आपली प्रतिमा मात्र खराब होतेय. आदरणीय ताई, मी तुमच्या डोळ्यातली भावना बघितलीय, तुमच्या मनात देखील आमच्याप्रमाणेच विचार आहे, पण तुमच्यावर दबाव येत असावा. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही कोणताही निर्णय घेताना केवळ खासदार, आमदार यांचं मत महत्त्वाचं नसतं तर पक्षासाठी निवडणुकीत रात्रंदिवस झटणारे लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार, विचार आणि नागरिकांची भावना देखील तेवढीच महत्वाची असते. त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे.
मला आमदार आणि खासदारांनाही सांगायचंय की, दबावापुढं झुकून संविधानाशी द्रोह करणार नाही, हे तुम्हीही हिंमत करुन दाखवून द्या. यासंदर्भात तुम्हालाही भूमिका स्पष्ट करावी लागेल. धाडस दाखवावं लागेल. आपला पक्ष लोकशाहीचा आदर करणार आहे. त्यामुळे उघड मतं मांडावीत. पण आपण डोळे झाकले म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडं नाही, असं कुणीही समजू नये. आपण ठाम भूमिका घेतली तर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्याचा विश्वासघात होणार नाही, शिवाय त्याचे प्रश्नही बाजूला सरणार नाहीत. पण मागील काही काळात राज्याच्या राजकारणातून सर्वसामान्य जनता हरवली असून दुर्दैवाने राजकारणाच्या केंद्रस्थानी केवळ सत्ता, पैसा आणि नेते आले आहेत. यामुळंच आजवरच्या सर्वात महाभयंकर अशा दुष्काळासारख्या प्रश्नावरचं लक्ष देखील बाजूला गेलं, परिणामी सामान्य जनता प्रचंड अडचणीत आली त्यांचा आवाज कोण मांडणार? याचा आपल्याला अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागेल.
आज महाराष्ट्राच्या मनात या विधेयकाविरुद्ध प्रचंड रोष आहे. राज्यातील सामान्य जनतेच्या भावना आणि देशातील लोकशाहीसमोरील आव्हानं पाहता, आपण या विधेयकाच्या बाजूने उभं राहणं हे आपल्या विचारांशी प्रतारणा ठरेल. वैयक्तिकरित्या माझा या डिलिमिटेशन विधेयकाला ठाम विरोध असून राज्यातील लाखो कार्यकर्त्यांची देखील हीच भावना आहे. म्हणूनच, तुमच्यातील संवेदनशील मनाला साद घालण्यासाठी एक सहकारी आणि कुटुंबातील सदस्य म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की, उद्या संसदेत मांडल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात आपण सर्वांनी मतदान करावं. इतकंच नाही, तर आपण या विधेयकाच्या विरोधात आहोत, ही स्पष्ट भूमिका आजच जाहीर करून साहेबांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो अस्वस्थ कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी जनतेला विश्वास द्यावा. पक्षाच्या दिल्लीतील सर्व घडामोडी आपणच नेहमी मीडियासमोर मांडत असतात. त्यामुळं या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतच्या सध्या सुरु असलेल्या चर्चा बघितल्या तर आपल्याला देखील त्यासाठी जबाबदार धरलं जातंय. दुसरीकडं तुमचा चेहरा पुढं करून खऱ्या अथनि यामागे असलेला आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक नेता मात्र शांतपणे बसला असून आपली प्रतिमा मात्र खराब होतेय. आदरणीय ताई, मी तुमच्या डोळ्यातली भावना बघितलीय, तुमच्या मनात देखील आमच्याप्रमाणेच विचार आहे, पण तुमच्यावर दबाव येत असावा. शेवटी आपण स्वाभिमानी महाराष्ट्रातील मराठी माणसं आहोत. त्यामुळं दबाव झुगारून धाडस दाखवावंच लागेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन साहेबांच्या विचारांचा वारसा अखंड ठेवण्यासाठी आपण या विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय नक्की घ्याल, असा मला विश्वास आहे आपला एक निर्णय आदरणीय साहेबांच्या विचारांचा सन्मान राखेल आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानालाही बळ देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद!
आपला,
देशाचा नागरीक व स्वाभिमानी महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता
