Rohit Pawar : सुशांत सिंगच्या मृत्यूचा मुद्दा तापवला, मग अजित दादांसारखा मोठा नेता गेला तर FIR का होत नाही ? – रोहित पवार संतापले

अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला एक महिना होत आला तरी एफआयआर दाखल होत नाहीये. रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. मुंबई आणि बारामती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणांवर दबाव असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला असून, महाराष्ट्राच्या नेत्याला न्याय का मिळत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

Rohit Pawar : सुशांत सिंगच्या मृत्यूचा मुद्दा तापवला, मग अजित दादांसारखा मोठा नेता गेला तर FIR का होत नाही ? - रोहित पवार संतापले
रोहित पवार संतापले
| Updated on: Feb 26, 2026 | 1:17 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महीना होत आला आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये त्याचं विमान लँडिंगदरम्यान क्रॅश झालं. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली व अनेक स्फोट झाले. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधानंतर विमानाचा अपघात की घातपात झाला असे अनेक प्रश्न, शंका, उपस्थित होत आहे. यात काही काळबेरं आहे का असाही सवाल लोकांच्या मनात होता. अजित पवार यांचा पुतण्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने हा मुद्दा उचलून धरत असून गेल्या 15 दिवसांत त्यांनी मुंबई व दिल्लीत अनेक पत्रकार परिषदा घेत या अपघातावर शंका उपस्थित केली.

एवढंच नव्हे तर रोहित पवार यांनी या प्रकरणी व्हीएसआर कंपनी व DGCA विरोधात सखोल चौकशीची मागणी केली. त्याचसंदर्भात ते काल मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र , तेथे पोलिसांनी एफआयर नोंदवण्यास नकार दिला. रोहित पवार व पोलिस यांच्यात बाचाबाची देखील झाली. त्यानंतर आज सकाळी रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच अजित पवारांचे चुलत भाऊ राजेंद्र पवार हे बारामती पोलिस स्टेशनमध्ये आले. या अपघाताप्रकरणी त्यांनी बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याती मागणी केली. मात्र आजही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. सुमारे 2 तास पोलिस स्टेशनमध्ये घालवल्यानंतर रोहित पवार हे पत्रकारांशी संवाद साधत होते.

सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूच्या मुद्याचे उदाहरण देत रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला न्याय का मिळत नाही, असा प्रश्न विचारत करत त्यांनी संताप व्यक्त केला.

FIR का घेतला जात नाही ?

काही वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली की काय , तो गेला हे सगळ दुर्दैवी होतं. तो मुंबईत रहात होता, पण तो काही महाराष्ट्राचा नव्हता. पण तरीही त्याच्या मृत्यूच्या मुद्यावरून एवढं रान उठवण्यात आलं, चौकशीची मागणी झाली. मग अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही एफआयआर का घेतला जात नाही? त्यांना न्याय का मिळत नाही ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

त्यांच्या मृत्यूला महीना होत आलाय, तरी इतक्या दिवसात काहीच का झालं नाही ? या इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळेच हा तपास योग्य दिशेन जात नाहीय़े, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

 

 

Follow Us