RSS ला 100 वर्ष पूर्ण, यंदाच्या दसरा मेळाव्याला होणार मोठी घोषणा, कार्यक्रमाची रुपरेषा काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष उत्सव नागपुरातील विजयादशमी मेळाव्यापासून सुरू होत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहे. यंदाच्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा खास असणार आहे. नागपुरात विजयादशमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
यंदाच्या विजयादशमीपासून ते २०२६ च्या विजयादशमीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या काळात देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरमध्ये डॉ. हेडगेवार यांच्या घरी १७ जणांच्या उपस्थितीत झाली होती. १७ एप्रिल १९२६ रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव निश्चित करण्यात आले. १९२६ साली पहिल्या विजयादशमी उत्सवात संघाचे पहिले पथसंचलन झाले होते.
तीन ठिकाणांहून संघाचे पथसंचलन निघणार
यंदा २७ सप्टेंबर रोजी नागपुरात तीन ठिकाणांहून संघाचे पथसंचलन निघणार आहे. हे तिन्ही पथसंचलन सकाळी ७:४५ वाजता व्हेरायटी चौकात एकत्र येतील, जिथे सरसंघचालक त्यांचे अवलोकन करतील. पथसंचलनानंतर योगा प्रात्यक्षिकेही सादर केली जातील. या कार्यक्रमासाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या कार्यक्रमात बजाज समूहाचे संजीव बजाज यांच्यासह घाना, इंडोनेशिया, थायलंड आणि अमेरिकेसह विविध देशांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत.
शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशभरात अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरात घर-घर जाऊन गृहसंपर्क अभियान चालवले जाईल. राज्यात ठिकठिकाणी हिंदू संमेलने, युवा संमेलने आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. बंगळूर, कोलकाता आणि मुंबईमध्ये सरसंघचालकांचे विशेष संवाद कार्यक्रम होणार आहेत. सध्या देशभरात ८३ हजारपेक्षा जास्त दैनिक शाखा आणि ३२ हजारपेक्षा जास्त साप्ताहिक मिलन सुरू आहेत, अशी माहिती सुनील आंबेकर यांनी दिली.
शंकर महादेवन राहणार उपस्थित
संघ गेली १०० वर्षे व्यक्ती निर्मितीसाठी काम करत आहे. यापुढेही करत राहील. समाजाला एकाच रूपात पाहणे, सामाजिक समरसता आणि स्वावलंबन यावर संघाचा विशेष भर आहे. या १०० वर्षांत संघाची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे समाजाने संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेणे. समाजाच्या प्रगतीसाठी संघाचे स्वयंसेवक अविरतपणे काम करत आहेत. ऑक्टोबरमध्ये जबलपूर येथे संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. तसेच, विजयादशमी कार्यक्रमात प्रसिद्ध गायक शंकर महादेवन संघाची गीतं गाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून संघ आपली १०० वर्षांची वाटचाल आणि भविष्यकाळातील योजना समाजासमोर मांडणार आहे, असेही सुनील आंबेकर यांनी सांगितले.
