जळगावातील शिवसेना कार्यालयात भूत असल्याची अफवा, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?
जळगावात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र कार्यालय नव्हते. त्यामुळे सिंधी कॉलनीत शिवसेनेचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. या कार्यालयातच भूत असल्याची अफवा आहे. त्याचा उल्लेख मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका मेळाव्यात केला.

जळगावातील नवीन शिवसेना कार्यालय उद्घाटनापूर्वी चर्चेत आले आहे. या कार्यालयात भूत असल्याच्या अफवांनी जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. त्या अफवांची दखल मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्यांनी आपल्या भाषणात याबद्दल उल्लेख केला. कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच आपणही रोज या कार्यालयात एक तास बसणार असल्याचे सांगितले.
जळगावातील सिंधी कॉलनीत शिवसेना कार्यालय उभारण्यात आले आहे. परंतु या जागेत दोष असून भूत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या कार्यालयाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: माहिती दिल्यानंतर हे कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे. एका मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात नव्या कार्यालयातील भूत असल्याच्या अफवेबद्दल कार्यकर्त्यांची समजूत काढली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र कार्यालय नव्हते. त्यामुळे सिंधी कॉलनी भागात शिवसेनेचे कार्यालय तयार करण्याचे काम मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरु केले. शिवसेनेच्या या नव्या कार्यालयात अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. परंतु या कार्यालयात भूत असल्याच्या अफवेने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. येत्या 4 जून रोजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते स्वतः या कार्यालयात बसणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना एका मेळाव्यात सांगितले.
रहिवाशी काय म्हणतात?
अनेक वर्षांपूर्वी या जागेला भूत बंगला असे नाव पडले आहे. प्रत्यक्षात मात्र तसा कुठलाही प्रकार नसून भूत असल्याची अफवा पसरली आहे, अशी माहिती या या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी दिली. या भागातील रहिवाशी म्हणतात, लोकांची ही अंधश्रद्धा आहे. आम्ही स्वत: या ठिकाणी चार वर्षांपासून राहत आहे. आम्हाला कधीच असा काही प्रकार आढळला नाही.
शिवसेना कार्यालय प्रमुख जितेंद्र गवळी म्हणाले, शिवसेना कार्यालयात भूत असल्याची अफवा आहे. तसा कुठलाही प्रकार नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवली आहे. कार्यालयाचे काम अपूर्ण असल्यामुळे कार्यकर्ते येत नव्हते. उद्घाटन झाल्यानंतर कार्यकर्ते कार्यालयात येतील, असे या कार्यालय प्रमुखांनी बोलताना सांगितले.
