
Opposition Mumbai Protest : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अगोदर सध्या राज्यात मतदार याद्या आणि बोगस मतदाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांविषयी आपली तक्रार केली होती. आता राज्यातील सर्वच विरोधक एकत्र आले असून ते येत्या 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढणार आहेत. याच मोर्चाबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे? असे विचारले जात होते. आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या मोर्चाबाबत तसेच काँग्रेसच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
सचिन सावंत विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हजर होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत 1 नोव्हेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या वितीने सचिन सावंत यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना संविधानाने प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे. तोच अधिकार लोकांच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा विरोध देशपातळीवर झाला पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.
पुढे बोलताना, विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची भेट घेत घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मात्र विरोधी पक्षाच्या मतांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार काही किंमत दिलेली दिसत नाही असे म्हणत त्यांनी केंद्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी मतदारांच्या घोटाळ्याबाबत दिलेल्या माहितीचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 41लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी याआधीच सांगितलेले आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रात सहा लाख 55 हजार मतदार वाढले, असा दावा सचिन सावंत यांनी केला.
निवडणूक आयोगाने हात झटकलेले आहेत. मतदारांची यादी आक्षेपार्ह आहे. या यादीत घोळ आहे. विधानसभा निवडणूक घोळ असलेल्या मतदार यादीच्या मदतीने झाली. आता नव्या मतदार यादीतही मोठा घोळ झालेला आहे. लोकशाही प्रक्रियेत आदर्श निवडणूक प्रक्रिया राबवली जात नाही, असा आरोपही सावंत यांनी केला. हे लोकशाहीला घातक आहे. याचा विरोध करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत. त्यासाठी 1 नोव्हेंबर हा मोर्चा जाहीर करण्यात आला आहे. सर्व विरोधी पक्ष या मोर्चात उतरेल, यात शंका नाही, असे म्हणत 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले.