
Samajwadi Party leader Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहे. अबू आझमी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुगल सम्राट औरंगजेब याचे त्यांनी कौतूक केले आहे. औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा दावा अबू आझमी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अबू आझमी यांच्यावर चौफेर टीका सुरु झाली आहे.
महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करताना म्हटले की, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. तो न्यायप्रेमी सम्राट होता. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत,’ असा आरोप अबू आझमी यांनी केला.
अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आझमींचे हे वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
Mumbai: Maharashtra Samajwadi Party President Abu Azmi on Aurangzeb says, "All the wrong history is being shown. Aurangzeb built many temples…Aurangzeb is not a cruel leader" pic.twitter.com/cfSr26ZE6o
— IANS (@ians_india) March 3, 2025
भाजप नेते राम कदम यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, आझमी ज्या औरंगजेबाचे कौतूक करत आहेत, त्या औरंगजेबाने हिंदूंवर अनेक अत्याचार केले. अबू आझमी यांनी इतिहास वाचावा. क्रूर औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना किती क्रूरपणे मारले हे पाहण्यासाठी थिएटरमध्ये त्यांनी छावा चित्रपटही पाहावा.
अबू आझमी यांनी यापूर्वी औरंगजेबचे समर्थन केले आहे. 2023 मध्ये त्यांनी औरंगजेबचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.