Chhatrapati Sambhajinagar: अखेर महायुती फिसकटली, भाजपच्या त्या प्रस्तावाने कटुता, आता दोन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा, उद्धव सेनेला फायदा होणार?

Mahayuti BJP-Shivsena: काल-परवापर्यंत जोर बैठका घेऊन सुद्धा महायुतीमध्ये मनोमिलन काही झाले नाही. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये बैठकांची सत्र झाली, खलबतं झाली. पण अखेर महायुतीचं घोडं काही पुढे दामटलं गेलं नाही. आता दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: अखेर महायुती फिसकटली, भाजपच्या त्या प्रस्तावाने कटुता, आता दोन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा, उद्धव सेनेला फायदा होणार?
महायुती फिसकटली
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 30, 2025 | 11:29 AM

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जोर बैठका वांझोट्या ठरल्या. मॅरेथॉन बैठकांमधून काहीच फळलं नाही. दोन्ही पक्षातील नेत्यांच्या जवळपास दहा बैठका झाल्या. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. महायुती झाली असंच जवळपास ठरलं होतं. पण काल संध्याकाळपासून वारं बदललं आणि शिवसैनिक भाजपवर नाराज झाले. शिवसैनिकांनी भाजपविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली. भाजपच्या भूमिकेवरच शिवसैनिकांचा संशय होता. तर भाजपच्या एका प्रस्तावाने महायुतीत खडा टाकला आणि महायुती फिसकटली.

दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार

छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना भाजपा युती फिस्कटली आहे.आता शिवसेनेचे इच्छुक आता संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत.या इच्छुकांची यादी माजी महापौर नंदकुमार घोडले करत आहेत.छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजपा शिवसेना युती फिस्कटली.दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षात वाद विकोपाला पोहचला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत.

त्या प्रस्तावाने महायुतीत मीठाचा खडा

115 जागा असलेली मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढण्याची दाट शक्यता होती. पण जागा वाटपाच्या सर्व चर्चा आणि बैठका वांझोट्या ठरल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिंदे शिवसेनेला केवळ 37 जागा देऊ केल्या होत्या. त्यामुळे शिंदेसेना प्रचंड नाराज झाली होती. भाजपच्या या दादागिरीला तसंच सडेतोड उत्तर देण्याची मागणी शिवसैनिक करत होते. राजेंद्र जंजाळ, विकास जैन या नेत्यांनी तर या सर्व घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. भाजप दमकोंडी करत असल्याचा दावा शिवसैनिक करत होते. तर या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती आणि एबी फॉर्म वाटप करण्याच्या तयारीमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे आज सकाळीच शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिला.

भाजपनं आम्हाला गाफील ठेवलं

9-10 बैठका झाल्या. पण काल काहींचा वेगळाच सूर दिसला. आम्हाला बोलणीत गुंतवून त्यांचा एबी फॉर्म भरण्याचा डाव होता. भाजप नेत्यांच्या अंहकारामुळे युती तुटली आहे. आम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अंधारात ठेऊन, गाफील ठेवण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा गंभीर आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला. विश्वासाला तडा दिल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. बैठकांमध्ये गुंतवून भाजप एबी फॉर्म भरण्याच्या तयारीत होता, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिंदे सेनेची भाजपविरोधात लढाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींचा उद्धव सेनेला फायदा होणार का, याची चर्चा सुरू आहे.

युती शिवेसनेनेमुळे तुटली 

तर दुसरीकडे भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेचे सर्व आरोप फेटाळले. युती शिवसेनेमुळे तुटली अशी प्रतिक्रिया टीव्ही ९ मराठीसोबत बोलताना दिला. आम्ही 37 जागा देण्यास तयार होतो. त्यांच्या निर्णयामुळे आम्ही एबी फॉर्म वाटत होतो. ज्या ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आल्या. त्या जागांवर शिवसेनेचा दावा होता असे सावे म्हणाले. मैत्रिपूर्ण लढत होईल की नाही हे समोर येईल. आम्हाला आता कळालं की त्यांना युती करायची नाही, असे सावे म्हणाले.