…तरच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती, भाजप नेत्याची स्पष्ट भूमिका
काल भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची बैठक झाल्यानंतर आज शिवसेना-भाजपची बैठक होत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तुफान गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे.

जालना प्रतिनिधी, भाजप-शिवसेना नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढले. पण आगामी महापालिका निवडणुका त्यांनी युतीमध्ये लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती संभाजीनगरची महापालिका दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपचे दोघांचे आमदार आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष विस्तार दोन्ही पक्षांचं उद्दिष्टय आहे. त्यामुळे जागावाटपात कमी-जास्त होऊ शकतं. दोन्ही पक्ष काही जागांवर अडून राहण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग छोटे असतात. एका मतदारसंघासाठी तीन-तीन, चार-चार उमेदवार इच्छुक असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच समाधान करण्याचं दोन्ही पक्षांसमोर आवाहन असणार आहे.
भाजप-शिवसेना जागा वाटपासंदर्भात नेत्यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्यात युती संदर्भात बैठक होईल. दुपारी 3 वाजता बैठक पार पडणार आहे. अतुल सावे 50 टक्के वर ठाम तर शिवसेनेला काय मिळणार याकडे लक्ष आहे. जागावाटपासंदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नसून बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आता पक्षातील मंत्र्यांची बैठक होईल.
अतुल सावे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
काल भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची बैठक झाल्यानंतर आज शिवसेना-भाजपची बैठक होत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तुफान गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे. स्वतः मंत्री अतुल सावे हे सर्वच इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्नांच्या संदर्भात विचारणा करताना पाहायला मिळाले. वॉर्डातील समीकरण, मतदानाची परिस्थिती आणि वार्डात काय गोष्टी केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी अतुल सावे यांनी इच्छुक उमेदवारांना विचारल्या.
अतुल सावे काय म्हणाले?
“अतिशय उत्साहात सगळीकडे मुलाखती सुरू आहेत. आम्हाला नक्कीच खात्री आहे दुपारी शिवसेनेबरोबर आमची युतीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत आम्ही ठरवू की सर्व प्रभागात किमान आम्हाला 50% जागा मिळाल्या तरच आम्ही युती करू. येणाऱ्या काळात या निवडणुकीमध्ये महायुतीचाच महापौर करू. लोकांनी विधानसभेला आम्हाला मोठा भाऊ म्हणून दाखवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीने महापालिकेत देखील लोक आम्हाला मोठा भाऊ करतील” असं अतुल सावे म्हणाले.
