लोकसभेसाठी मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार नकोच; मनोज जरांगे यांना वकिलांचे साकडे

| Updated on: Mar 29, 2024 | 2:38 PM

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या 30 मार्च रोजी लोकसभेच्या रिंगणात जास्तीत जास्त उमेदवार द्यायचे की इतर कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय ते जाहीर करणार आहेत. पण त्यापूर्वीच मराठवाड्यातील वकिलांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

लोकसभेसाठी मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार नकोच; मनोज जरांगे यांना वकिलांचे साकडे
मनोज जरांगे पाटील
Follow us on

गेल्या वर्षीच्या मध्यंतरानंतर मराठा आंदोलनाने देशाचेच नाही तर जगाचे लक्ष वेधले. लाखोंचे मोर्चे आणि तितक्याच ताकदीच्या सभांनी महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठी घुसळण झाली. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटविण्याचा प्रयत्न झाला. मराठा आंदोलकांना या आंदोलनातून अनेक धडे गिरवता आले. आता लोकसभा निवडणुकीत राजकीय धडा गिरविण्याची संधी या आंदोलकांना आली आहे. समाजाने प्रत्येक लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त उमेदवार देण्याची मागणी होत आहे. उद्या 30 मार्च रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे याविषयीचा निर्णय जाहीर करतील. पण त्यापूर्वी मराठवाड्यातील वकिलांनी त्यांन सबुरीचा सल्ला दिला आहे.

उमेदवार न देण्याची केली मागणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील 50 हून अधिक वकिलांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी जरागे यांना केले. कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून या वकिलांनी जरांगे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

दीड तास खल

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 मतदारसंघात प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार उभे करायचे की नाही? याबाबत जरांगे हे 30 मार्च रोजी निर्णय घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर वकिलांनी त्यांची भेट घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे केल्यास अथवा युती करुन निवडणुका लढल्यामुळे मराठा समाजाचे काय संभाव्य नुकसान होऊ शकते, याबाबत जरांगे यांच्याशी या वकिलांनी दीड तासांहून अधिक वेळ चर्चा करून तपशीलवार माहिती दिली.

वकिलांनी रात्री घेतली मनोज जरांगे यांची भेट

आरक्षणाच्या आंदोलनाला खीळ

अपक्ष उमेदवार उभे केल्यास, पक्षाशी युती करून निवडणूक लढल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहिल. आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होईल. या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊन आरक्षण आंदोलनालाच यामुळे खीळ बसण्याची भीती वकिलांनी व्यक्त केली. अपक्ष उमेदवार उभे केल्यास मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाजविघातक शक्ती त्याचा अधिक फायदा उचलतील, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले.

तटस्थ राहा

वकिलांनी जरांगे यांना आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या पक्षांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवावा अथवा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे न करता तटस्थतेची भूमिका घेण्याचे आवाहन केले. बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील वकिलांचा यामध्ये समावेश होता.