
संभाजीराजे यांनी आज विशाळगडावरील झालेल्या आंदोलनानंतर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, ‘प्रशासनाने आधीच याची दखल घेतली असती तर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती. विशाळगडला आम्ही डिसेंबर ४ ला भेट दिली होती. गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण तेथे झाले आहे. एक मुखाने आम्ही सर्व एकत्र आलो आणि डिसेंबर ७ ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ग्रामस्थांनी देखील ही गोष्ट स्वीकारली. हा धर्माचा विषय नाही हा अतिक्रमणाचा मुद्दा आहे. विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला. या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांचं इथे वास्तव्य होतं. विशाळगडावर जिथे लोकं माती लावण्यासाठी आले. तिथेच इतका गलिच्छपणा सुरु आहे. मद्यपान केले जात आहे. कर्नाटकातून लोकं इथे पार्ट्या करायला येत होते. खुलेआम इथे कत्तलखाने सुरु होते’
‘जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने मला हे हाती घ्यावं लागलं. या ठिकाणी मोठा दहशतवादी ७ दिवस राहिला आहे. यावर पालकमंत्री काही बोलत नाही. म्हणून हा लढा मी सुरु केला. १५ जुलैला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की अतिक्रमण मुक्त करा. मग सहा महिन्याआधी हे का केले नाही. हे आधीच झालं असतं तर मला जाण्याची गरजच भासली नसती.’
‘मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. जे जे मोहिमेसाठी आले त्यांचं आभार व्यक्त करतो. जे जे शिवभक्त आले त्यांचे आभार मानतो. माध्यमांचे आभार मानतो. फक्त एकच खंत आहे की, हा विषय धर्माच्या वर घेऊ नये. प्रामाणिकपणाने आम्ही काम करतोय. गड किल्ले अतिक्रमणमुक्त व्हावे अशीच आमची इच्छा आहे. रायगड किल्ल्यावर १० झोपड्या आहेत. त्यांची अनेक पिढ्या तिथे राहताय. पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. त्यांना आपण काढणार नाही. ते गरीब आहेत.’
‘पालकमंत्री आणि माजी पालकमंत्री असे म्हणताय मी पुरोगामित्व सोडलंय. तुम्ही किल्ल्यावर गेले आहेत का. तुम्हाला काय अधिकार आहे बोलण्याचा. तुम्ही किती निधी दिला किल्ल्यांसाठी सांगा. एक व्यक्ती जर गडकिल्ल्यांसाठी काम करत असेल तर त्याला पात करायचं हे बरोबर नाही.’
‘जे अतिक्रमण काढलं त्याच्यात पहिल्या हिंदू लोकांचं अतिक्रमण काढलं. हे हिंदू मुस्लीम वाद नाहीये. महाराष्ट्राला हे परवडणारे नाही. सरकारने काही तरी पॉलिसी ठरवणे गरजेचे आहे. काही नियम तयार केले पाहिजे. किल्ल्यांचं संवर्धन कसे करणार याचा रोड मॅप असणं गरजेचं आहे.’
‘जे काही जाळपोळ झाला त्याला मी समर्थन करत नाही. पण ही वेळ का आली. भिमा कोरेगावचा विषय झाला तेव्ही संसदेत मी बोललो आहे. महाराष्ट्रात जातीय पडसाद जर उमटले तर त्याला ते जबाबदार असतील.’
‘गुन्हा दाखल झाल्याचं कळताच मी तिथे हजर झालो. पण त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी काहीच सांगितलं नाही. मी फक्त एकच विनंती केली माझ्यावर गुन्हा दाखल करा. शिवभक्तांना जबाबदार धरु नका.’