Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून अलिबागमध्ये जमिनीची अफाट खरेदी, म्हात्रोळी गावात..संजय राऊत यांनी फोडला नवीन बॉम्ब
Sanjay Raut : संजय राऊत यांनी आज एक नवीन बॉम्ब फोडला आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राऊतांनी थेट पीएमओ इंडिया, देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना टॅग केलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून संजय राऊत यांनी राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा गंभीर आरोप केला आहे. “संवैधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे उत्तम उदाहरण आहे. अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे. आदिवासी त्यांच्या जमीन, घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे? कोणाच्या बाजूने आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी पोस्ट केला होता. आता मात्र संजय राऊत यांनी पत्र लिहिलं आहे. अलिबागच्या म्हात्रोळी गावातील गरीब आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा आरोप राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची दखल घेऊन नार्वेकर यांना तंबी द्यावी असा संजय राऊत यांनी पत्रात उल्लेख केला आहे. जमिनीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, जे संबंधित लोक आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा अशी संजय राऊत यांनी मागणी केली आहे.
आदिवासींवर जबरदस्ती करुन त्यांना पळवून लावतात
गरीब आदिवासींवरील अन्याय थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी. राहुल नार्वेकर यांनी संवैधानिक पदावर राहू नये अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी दोन महिन्यांपूर्वी असाच व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीएमओ इंडिया, अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना टॅग केलं आहे.
“संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात वावरताना किमान मर्यादेचे पालन केलं पाहिजे. राहुल नार्वेकर यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज मागच्या काही काळापासून आंदोलन करत आहे. पण पोलीस यंत्रणा आदिवासींवर जबरदस्ती करुन त्यांना पळवून लावत आहे” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.