संजय राऊतांकडून संसदेसाठी वादग्रस्त शब्दप्रयोग; राम कदमांची जहरी टीका, उल्लेखावरून राजकीय वाद पेटला
Sanjay Raut News: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या एका अहवालानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निलंबन आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावर बोलताना संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी बोलताना ‘रखेल’ असा उल्लेख केला आहे. यानंतर त्यांचे वक्तव्य वादात सापडले आहे. यावर आता भाजप आमदार राम कदमांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कदमांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. तसेच एक मोठी मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले होते की, संसदेत मुद्दा उपस्थित करून काय होतं? संसद काही लोकांनी रखेल बनली आहे. संसदेत मुद्दा उपस्थित करून काही झालं असतं तर राम मंदिराचा मुद्दा उपस्थित झाला असता. एसआरएचा मुद्दा उपस्थित करण्याचे आम्ही प्रयत्न केले होते. मी म्हणालो ना संसद अमित शाह, नरेंद्र मोदी या लोकांची रखेल बनली आहे. हे चुकीचं आहे. यावर राष्ट्रपतींनी बोलेल पाहिजे. मात्र त्या गप्प बसतील तर आम्ही बोलू.
संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर राम कदमांनी मोठे वक्तव्य केले आहे. राम कदम म्हणाले की, संजय राऊत संसदेला रखेल म्हणत आहे. रखेलचा काय अर्थ होतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानातून ही संसद उभी राहिली आहे. तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहात. त्या संविधानाचा अपमान करत आहात. संजय राऊतांनी याची जाणीव नाही. तसेच जर तुमच्या दृष्टीकोनातून रखेल आहे, तर द्या आजच्या आज राजीनामा, असं म्हणत राम कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही टीका केली आहे. त्यांनी ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राहुल गांधींच्या सांगण्यावरून संजय राऊत यांनी भारतीय संसदेचा म्हणजेच भारतीय लोकशाहीच्या मंदिराचा अपमान केला आहे. केवळ लोकशाहीवर विश्वास नसलेले ‘बौद्धिक नक्षलवादी’च असे विधान करू शकतात, असं ते म्हणाले.