संजय राऊत यांच्याकडून विजय मल्ल्या याला क्लिनचिट; देश सोडून पळालेल्या उद्योजकावर उधळली स्तुतीसुमने

sanjay raut : संजय राऊत यांनी विजय मल्ल्या याला क्लिनचिट दिली आहे. त्यांनी बोध कीर्तन पुस्तकातून देश सोडून पळालेल्या उद्योजकावर स्तुतीसुमने उधळली आहे.

संजय राऊत यांच्याकडून विजय मल्ल्या याला क्लिनचिट; देश सोडून पळालेल्या उद्योजकावर उधळली स्तुतीसुमने
sanjay raut news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 12:52 PM

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देश सोडून पळालेला उद्योजक विजय मल्ल्या याला क्लिनचिट दिली आहे. तो फ्रॉड कधीच नव्हता, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून विजय मल्ल्या याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. मोदी सरकारनेच मल्ल्याला देश सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मल्ल्या याला लोक ‘भगोडा’ म्हणतात, ते मला पटत नाही, असंही राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी मल्ला याला क्लिनचिट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘बोध कीर्तन’ पुस्तकात ‘मल्याची गोष्ट’ या प्रकरणात संजय राऊत यांनी विजय मुल्ल्याबाबतचा अनुभव सांगितला आहे.

संजय राऊत यांनी ‘बोध कीर्तन’ पुस्तकात म्हटलं की, विजय मल्ल्या खरोखरच दिलदार होता. मोकळ्या मनाचा होता. कोणाला फसवून व्यापार करण्याची त्याची मानसिकता नव्हती. एक दिवस संसदीय अधिवेशन चालू असताना भारतातून निघून गेला. लोक म्हणतात तो ‘भगोडा’ आहे. मला ते पटत नाही. त्याने एका उद्योगासाठी बँकेचं कर्ज घेतलं. तो उद्योगच कोसळला. कर्ज थकलं. अशावेळी बँकांनी त्याला सहकार्य करायला हवं होतं. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक उद्योगपतींना कर्जमाफी दिली. मल्ल्याला कर्जमाफी नको होती. त्याला थोडी सवलत हवी होती. पण त्याला देश सोडायला भाग पाडलं’.

Loading...

‘विजय मल्ल्या याच्या व्यावसायिक कर्तृत्वावर शंका घेणे चूक आहे. लंडनला गेलो असता मी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो शहरात नव्हता. माझ्या मते तो ‘फ्रॉड’ कधीच नव्हता. विजय मल्ल्या दानशूर व धार्मिक होता. त्याचा अनुभव मी घेतला… खास करून त्याच्या धार्मिकपणाचा. एकदा विजय मल्ल्या मला मुंबई विमानतळावर भेटला. त्याच्या हातात प्रसाद व बहुदा जास्वंदीचे फुल होतं.  त्याने मला प्रसाद दिला. तो नुकतेच महालक्ष्मीच्या मंदिरातून आला होता. कपाळावर गंध होतं. त्याचं किंगफिशर एअरलाइन्स हेलकावे खाऊ लागलं व कर्जाचे हप्ते थकले वगैरे बातम्या सुरू झाल्या, असे राऊतांनी पुस्तकात म्हटलं.

राऊतांनी पुढे पुस्तकात म्हटलं की, ‘लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यावेळी एकदा मला मल्ल्या सेंट्रल हॉलमध्ये भेटला. विजयजी, निवडणुका आहेत. इतर पक्षांना काही मदत करणार असाल तर आमच्या पक्षावर अन्याय करू नका, मी गमतीने खडा टाकला. विजय मल्ल्याच्या चेहऱ्यावर कोणतीच प्रतिक्रिया नव्हती. पण डोळ्यात अस्वस्थता दिसली. आठ दिवसांनी मल्ल्या पुन्हा भेटला. मी आठवण केली. तो म्हणाला ‘यावेळी कोणालाच मदत करणं शक्य नाही, माझी सर्व बँक खाती गोठवली आहेत. कर्मचाऱ्यांचे पगारही त्यामुळे देता येत नाहीत.  अशी वेळ माझ्यावर कधी येईल असं वाटलं नव्हतं. तरीही बघा. फुल न फुलाची पाकळी. खरोखरच शक्य नाही. याआधी मी भरभरून दिलं. आता मी तुम्हाला त्यापेक्षा कमी दिलं, तर ते तुमच्या आणि माझ्या प्रतिष्ठेला शोभणार नाही. समजून घ्या. मल्ल्याचं म्हणणं खरंच होतं’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us