लवकरच मराठी पंतप्रधान होणार, बड्या नेत्याचं नाव घेत संजय राऊतांचा दावा; नेमकं काय म्हणाले?

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आणि नगरसेवकांच्या हॉटेल वारीवरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आम्हाला अभिमानच आहे, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा खोचक सल्ला दिला आहे.

लवकरच मराठी पंतप्रधान होणार, बड्या नेत्याचं नाव घेत संजय राऊतांचा दावा; नेमकं काय म्हणाले?
sanjay raut
| Updated on: Jan 19, 2026 | 12:04 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हॉटेल पॉलिटिक्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजपच्या नगरसेवकांनाही आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवावे लागत आहे, यावरून सरकार नेमके कोणाला घाबरतेय? असा सवाल करत संजय राऊतांनी केला. यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्य दाव्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

आम्ही फक्त मजा बघतोय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय समीकरणे बदलत आहे. असे असताना अनेक नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवल्याच्या चर्चा आहेत. आम्ही अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, आम्ही सध्या केवळ मजा पाहण्याच्या भूमिकेत आहोत. ज्यांच्याकडे सत्ता आहे, जे स्वतःला शक्तिशाली समजतात, त्यांनाच आपले नगरसेवक सांभाळण्यासाठी हॉटेलचा आसरा घ्यावा लागत आहे. हे चित्र पाहता महाराष्ट्रात सध्या भीतीचे वातावरण कोणामुळे निर्माण झाले आहे, हे स्पष्ट दिसते, असे संजय राऊत म्हणाले.

दावोस दौरा आणि पंतप्रधान पदाची चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस (स्वित्झर्लंड) येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी गेले आहेत. तिथे झालेल्या स्वागताचा दाखला देत संजय राऊतांनी उपरोधिक टीका केली. काल दावोसमध्ये फडणवीसांचे ज्या पद्धतीने स्वागत झाले, ते पाहून आम्हाला वाटले की देशाचे पंतप्रधानच तिथे आले आहेत. ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले होते, तसे स्वागत केवळ पंतप्रधानांचेच होते. मुख्यमंत्र्यांचे स्वागत कसे झाले हे आपण पाहिले, पण फडणवीसांच्या या स्वागतामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

आमच्या आशा पल्लवीत झाल्या

यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट दिल्लीत जाऊन नेतृत्व करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “एक मराठी माणूस जर फडणवीस यांची पावलं पतंप्रधान पदाकडे पडत असतील, तर मराठी म्हणून आम्हाला अभिमान आहे. त्यांनी दिल्ली जावं. देशाच्या पंतप्रधानपदी दावा ठोकावा. महापालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, त्यांनी आता महापालिका आणि नगरपालिकांच्या राजकारणातून बाहेर पडले पाहिजे. त्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या की मराठी पंतप्रधान देशाला मिळणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.