सुप्रिया सुळेंच्या व्याहींना उमेदवारी जाहीर होताच संजय राऊत म्हणाले, भविष्यात त्यांच्यावर राष्ट्रवादीची…
प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश, अरुण लखानी-मोदी भेट आणि 'भाजपयुक्त काँग्रेस' यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

“आम्ही मतदारसंघाच्या विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षात जातोय, हे नेत्यांचं ढोंग आता महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड झालं आहे. हे ढोंग त्यांनी आता बंद करावं”, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. विधानपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. यावरुन संजय राऊत यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रत्यक्ष निवडणुकीवेळी बघू
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, महायुती सरकार आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर चौफेर फटकेबाजी केली. त्यासोबतच विकासकामांच्या नावाखाली होणारे पक्षांतर, लाडकी बहीण योजनेतील गोंधळ आणि उद्योगपती अरुण लखानी यांच्या मोदी भेटीवरही त्यांनी भाष्य केले. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आता प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हा काय ते सर्व रणांगणात बघू, असे संजय राऊत म्हणाले.
विकास फक्त सत्ताधाऱ्यांच्या पक्षात गेल्यावरच होतो का?
प्राजक्त तनपुरे हे कालची विधानसभा निवडणूक भाजपच्या विरोधात लढले होते. पण आता अचानक भाजप त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे. ते भाजपमध्ये का गेले? तर म्हणे मतदारसंघाची विकासकामं करायची आहेत! मग माझा सत्ताधाऱ्यांना आणि अशा नेत्यांना सवाल आहे की, सध्या जे आमदार विरोधी पक्षात राहून अहोरात्र काम करत आहेत, ते आपल्या मतदारसंघात विकासकामं करत नाहीत का? विकास फक्त सत्ताधाऱ्यांच्या पक्षात गेल्यावरच होतो का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
भाजपनेही आता पक्षांतराला काहीतरी मर्यादा पाळल्या पाहिजेत. बाहेरून येणाऱ्या नेत्यांसाठी पायघड्या घालण्यापेक्षा त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना काहीतरी जबाबदाऱ्या आणि संधी दिल्या पाहिजेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
अरुण लखानी जन्मजात RSS चे
यानंतर संजय राऊत यांना अरुण लखानी यांच्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. अरुण लखानी हे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते नाहीत. ते जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आहेत. ते संघाचे निष्ठावान कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकारी आहेत. सर्वच बाबतीत संघाला ताकद देणारे ते एक सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी मोदींची भेट घेतली यात आश्चर्यकारक काय आहे? जेव्हा मी दिल्लीत राज्यसभेतील अनेक लोकांची माहिती घेतो, तेव्हा त्यांचं मूळ कुठेतरी संघाशी जोडलेलं असतंच. विदर्भात भाजपचे जे कोणी जुने आणि ज्येष्ठ चेहरे आहेत, त्या यादीत लखानी यांचे नाव अग्रक्रमाने येते. संघ आणि भाजप काय वेगळा आहे का? हे दोन्ही एकच आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांना लखानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीबद्दल विचारणा करण्यात आले. त्यावर त्यांनी भविष्यात लखानींवर राष्ट्रवादीचे कार्यध्याक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल, असे म्हटले.
सध्या भाजपयुक्त काँग्रेस करून ठेवली
आज देशातील बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री हे मूळचे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे आहेत. भाजपमध्ये आता मूळ भाजपचे लोक उरलेच किती? यांच्या १०० पिढ्या आल्या तरी त्यांना ‘काँग्रेसमुक्त भारत’ करता येणार नाही. उलट, या लोकांनी सध्या ‘भाजपयुक्त काँग्रेस’ करून ठेवली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.