देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, राजकीय चर्चांना उधाण

Sanjay Raut on Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, राजकीय चर्चांना उधाण
Fadnavis and Raut
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 9:35 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि जगभरातील कंपन्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचा हा दौरा खास मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर अधिकारीही दावोसला गेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे दावोसमध्ये जोरदार स्वागत केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. एक्सवर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राऊत यांनी फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तुलना करत त्यांना टोलाही लगावला आहे. संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

संजय राऊतांचे ट्वीट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोवोसमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विमानतळावर मोठी गर्दी पहायला मिळाली. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे, महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय!”

पुन्हा फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा

खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कारण राऊत यांनी फडणवीस यांची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे. आपण याआधी अनेकदा पाहिले आहे की, पंतप्रधान मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्या देशातील शेकडो भारतीय लोक विमानतळावर हजर असतात. अनेक ठिकाणी पंतप्रधानांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले जाते. तशाच प्रकारचे स्वागत फडणवीसींचेही करण्यात आल्याने संजय राऊतांनी हे विधान केले आहे. तसेच फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचेही भाकित केले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. याआधीही देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्या बातम्या खोट्या ठरल्या होत्या. आता पुन्हा एकदा फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचे बोलले जात आहे.