मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा विषय सरकार…

लष्करप्रमुखांच्या विधानाचा समाचार घेत संजय राऊत यांनी आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचे आव्हान केंद्र सरकारला दिले आहे. तसेच अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला आणि संजय राठोडांच्या ताफ्यावरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा विषय सरकार...
sanjay raut
| Updated on: May 31, 2026 | 11:37 AM

आपण ऑपरेशन सिंदूरसाठी सज्ज आहोत ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्या माहितीनुसार ऑपरेशन वन अजून संपलेले नाही. जोपर्यंत देशातून दहशतवादाचा पूर्ण नायनाट होत नाही, तोपर्यंत ऑपरेशन वन संपणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ऑपरेशन वननुसार आधी पाकव्याप्त काश्मीर (PoK) ताब्यात घ्यावे. त्यावर अजून काहीच कारवाई झालेली नाही आणि लष्करप्रमुख थेट ऑपरेशन टू बद्दल बोलत आहेत. कुठे देशात निवडणुका लागल्या आहेत का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यात लष्करप्रमुखांनी केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या संरक्षण धोरणावर आणि आगामी निवडणुकांच्या टायमिंगवर जोरदार टीका केली. तसेच अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

यावेळी संजय राऊतांना मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मला फार कमी माहिती आहे. पण हा एक तांत्रिक विषय आहे. हा विषय सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा करुनच हा विषय सुटेल. अन्य कोणी यावर चर्चा करु नये, असे संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत धिक्कार केला. राऊत म्हणाले, अभिषेक बॅनर्जी हे एकदा नाही, तर अनेकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. पश्चिम बंगालची शान असलेल्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. काल आम्ही पाहिले की, हा हल्ला फूस लावून जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आला आहे. विरोधकांना दाबण्यासाठी जर देशात असेच राजकारण खेळले जाणार असेल, तर आम्हीही त्याला चोख उत्तर द्यायला आणि लढायला पूर्णपणे तयार आहोत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

नियम डावलणाऱ्या संजय राठोडांवर कारवाई करून आदर्श दाखवा

यावेळी संजय राऊत यांना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यावरून एक सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी गृहखात्याला आणि सरकारला खडे बोल सुनावले. जर मंत्र्यांच्या ताफ्याकडून नियम मोडले जात असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि कायद्याचा आदर्श दाखवून द्या. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सामान्य नागरिकांप्रमाणे सायकलवर फिरत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी मंत्र्यांचे असे ताफे निघत आहेत, हे योग्य नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

प्राजक्त तनपुरेंना माझी राजकीय श्रद्धांजली

अजित पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या संदर्भातील एका वादावर विचारले असता, संजय राऊत यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत त्यांचा विषय संपवला. मी अशा बदलत्या भूमिकेच्या लोकांना माझी राजकीय श्रद्धांजली वाहतो. अशा लोकांवर मला पुन्हा बोलायचे नाही आणि वेळही वाया घालवायचा नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us