या सरकारचा एन्काऊंटर करा, नसरापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप; फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्याचे…

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केली असून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले आहेत.

या सरकारचा एन्काऊंटर करा, नसरापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप; फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्याचे...
sanjay raut devendra fadnavis
| Updated on: May 03, 2026 | 10:37 AM

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील नसरापूर प्रकरणी भाष्य केले. ही पहिली घटना नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यापासून राज्यातील महिलांवरील अत्याचार, हत्या, कायदा सुव्यवस्था याचे पूर्ण वाटोळे झालेले आहे. त्याचे कारण असं आहे की त्यांनी गृहमंत्री म्हणून जी कर्तव्य पार पाडायला हवी होती, ती पार पाडली जात नाहीत. सातत्याने लहान मुलींवर अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं वाढली आहेत आणि आमचे मुख्यमंत्री टिवल्या बावल्या करत इकडे तिकडे कधी पश्चिम बंगालमध्ये, कधी केरळमध्ये प्रचाराला, कधी आसामध्ये प्रचाराला, कधी तामिळनाडूत प्रचाराला असतात. कायदा आणि सुव्यव्यस्थेच्या बाबतीत राज्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे. तरीही मुख्यमंत्री २४ तास राजकारणात अडकेलेले आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

काल मिसिंग लिंक रस्त्याच्या उद्घाटनावेळी ट्राफिक जाममुळे लोकांचे हाल झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांनी विनम्रपणे लोकांची माफी मागितली. कालच्या प्रकरणाबद्दल खरंतर त्यांनी माफी मागायला हवी. मुलींवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी एकदा तरी माफी मागितली आहे का, त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. काल ज्या मुलीवर अत्याचार झाले, त्या दुर्देवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात फडणवीस १५०० रुपये टाकत असतील. त्या १५०० रुपयांच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशाप्रकारचे अत्याचार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिला आहे का, तुम्हाला आम्ही १५०० रुपये देतोय त्यामुळे आता बहि‍णींनी तोंड बंद करावं, हे या राज्यात सुरु आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केला.

हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेलं नाही

या महाराष्ट्रातील माता आणि भगिनींनी या सरकाराविरुद्ध बंड केले पाहिजे. या सरकारला जाब विचारला पाहिजे. विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेलं नाही, असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय. पैशांचा माज, मस्ती आणि सत्ता यावर राज्य सुरु आहे. ४ वर्षांच्या मुलीवर कायद्याचा धाक नसल्यामुळे नराधम अत्याचार करु शकतो. याला जबाबदार राज्य सरकार आणि गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले.

तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. तुम्ही तुमच्या कायद्याचा धाक सामान्य जनतेला दाखवत आहेत. ज्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केलात, त्यांचा काय दोष आहे, ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावर उतरले कारण सरकार नालायक आहे. या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे. याप्रकरणी आरोपी सरकार आहे. पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापरले जात आहेत. सरकारवर खटला दाखल व्हायला पाहिजे. या सरकारचा एन्काऊंटर केलं पाहिजे. हे सरकारचं नालायक आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.

Follow Us