
यंदाचं वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. आरएसएसच्या (RSS) 100व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईतील नेहरू सेंटर इथे संघाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह बॉलिवूड दिग्गजांनीही हजेरी लावली होती. आता या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी संघावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संघाच्या कार्यक्रमाला सिनेकलाकार, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, त्यातील काही लोकांची पार्श्वभूमी पाहता भाजप आणि संघाच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले आहेत. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संघाच्या कार्यक्रमाला अनेक लोकांना आमंत्रण होतं. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर होते. त्यातील काही लोकांना पाहिल्यावर आम्हाला भाजपच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल धक्का बसला. हे किती ढोंगी आणि पाखंडी आहेत. गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करत होता. सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावं किंवा ज्यांनी निमंत्रण दिलं त्यांना माहिती नसावं की हा व्यक्ती देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अदनान सामीचे वडील हर्षद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होतो. १९६५ च्या युद्धात या हर्षद खान यांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोठचं तळ उद्धवस्त केला होता आणि त्यांचा मुलगा अदनान सामी हा सरसंघचालकांच्या बंगल्यात बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय, कोणते इतिहासाचे धडे देताय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
एका नटीने आय लव्ह भागवत असे म्हटले. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआऊट नोटीस आहे. तिच्या नवऱ्यावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप होता आणि तो अटकेत होता. असे असंख्य लोकं तिथे होते. संघाचे चारित्र्य किती बिघडलं आहे, हे त्यांना माहिती नसेल. या सर्वांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय, संघ पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला संघाविषयी आदर आहे, प्रेम आहे. देशाला अजून अच्छे दिन आलेले नाहीत. याला जबाबदार संघ आहे. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले आहेत. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, असेही संजय राऊत म्हणाले.
त्यांनी चारित्र्याच्या गोष्टी केल्या. पण देशभरातील सर्व गुन्हेगार, व्याभिचारी बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यामुळे आपल्या देशात कोणते सामाजिक परिवर्तन होणार आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्यांचं सरकार आहे. संघाचे सरसंघचालक ज्या सरकारमध्ये आहे आणि जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जिवाचे रान केले आहे. ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही, हा सवाल त्यांनी भाषणात विचारण्यापेक्षा त्यांनी तो थेट मोदींना विचारायला हवा. भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही संजय राऊतांनी म्हटले.