संजय राऊतांचं सरन्यायाधीशांना पत्र, केलं अभिनंदन, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणामधील दहा आमदांच्या पक्षांतर प्रकरणासंदर्भात संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे.

संजय राऊतांचं सरन्यायाधीशांना पत्र, केलं अभिनंदन, नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 8:09 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. तेलंगणामधील दहा आमदाराच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाकडून परखड मत व्यक्त करण्यात आलं,  आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचा किरण दाखवणारं आहे, मूळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल, त्याबद्दल आपले अभिनंदन असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

तेलंगणातील 10 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाने परखड मत व्यक्त केलं, मुळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल, विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती असल्यानं ते बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया लांबवतात हे आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचे किरण दाखवणारे आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. सरन्यायाधीश साहेब मी आजचा सामनातील प्रसिद्ध झालेला याच विषयावरील अग्रलेख पाठवत आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या लोकभावना आहेत, असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

 

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिवसेनेत दोन गट निर्माण झाले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेने शिंदे गट. मात्र ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यांना अपात्र करण्यात आलं नाही, तसेच जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, त्या आमदार देखील पात्र ठरवण्यात आले. एवढंच नाही तर आमदारांच्या संख्या बळावर पक्षाचं चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं.

आता अशाच एका तेलंगणामधील प्रकरणात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे, त्यानंतर संजय राऊत यांनी सरन्यायाधीश यांचं अभिनंदन केलं आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या लोकभावना आहेत, असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.