
Pankaja Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस महायुतीच्या नेत्यांवर आरोप करत आहे. यामुळे राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात मग धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली? असा सवाल करत सुरेश धस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी हा सवाल केला.
आमदार सुरेश धस, पंकजा मुंडे दोन्ही भाजपत आहेत. परंतु त्यांच्यात राजकीय मतभेद आहेत. त्यामुळे एकमेकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न ते करत असतात. सुरेश धस यांच्यासंदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. धनंजय मुंडे मागील महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्री होते. त्यावेळी सुरेश धस आमदार होते. वाल्मिक कराड याचे काम सुरु होते. त्यावेळी धस यांनी त्यासंदर्भात कधी तक्रार का केली नाही? आताच त्यांना बीडमधील गुन्हेगारी कशी दिसू लागली? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाजपमध्ये राष्ट्रीय नेता आहे. त्यानंतरही पक्षातील एक आमदार आपल्यावर आरोप करत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत एकप्रकारे या प्रकरणात पक्षश्रेष्ठींना घेतलेल्या भूमिकेबद्दल पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
एकंदरीत संतोष देशमुख प्रकरणात होणाऱ्या आरोपांनंतर भाजप श्रेष्ठींना घेतलेल्या भूमिकेवर पंकजा मुंडे नाराज असल्याचे दिसून येत आहे. सुरेश धस यांनी हा विषय इतका लावून का धरला? या विषयावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी अनेक आरोप केल्याचे पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे.