
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी कोर्टात सुनावणी झाली. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांवर खून आणि मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात ३१ डिसेंबर २०२४ पासून आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहे. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी कराड याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती सुशिल एम.घोडेस्वार यांच्या न्यायालयात या याचिकेवर आज सुनावणी आली झाली. कराडच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, कराड याला त्याच्या अटकेची कारणे पोलिसांनी लेखी स्वरुपात दिलेले नाही. यामुळे त्याची अटकच बेकायदेशीर आहे असा युक्तीवाद त्यांनी यावेळी केला. आपल्या अशिलाला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने मकोका लावण्यात आला. मकोका आदेशाची मंजूरी ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे. तसेच कराड याचा या घटनेशी कोणताही संबंध नाही असाही यु्क्तीवाद जेष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते यांनी केला.
देशमुख यांच्या हत्येच्यावेळी तो घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. खोट्या पद्धतीने कराडला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे., त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करीत त्यास जामीन देण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. कराड याच्या वकिलांचा युक्तीवाद खोडून काढताना मुख्य सरकारी वकिल अमरजितसिंह गिरासे देशमुख यांनी या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. प्रत्येक घटनेत साक्षीदार आहेत, सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची आपआपसातील ऑडिओ रेकॉर्डिंग सरकारी पक्षाकडे आहे. शिवाय या सर्व पुराव्यांना पुष्टी देणारे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल आहेत असेही सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितले.
कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असून अवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने कंपनी बंद करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.कंपनी बंद करू नका, रोजगार जाईल यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी विनंती केली. यामुळे चिडून जाऊन आरोपींनी त्यांचे अपहरण करुन निघृण हत्या केल्याचे गिरासे यांनी कोर्टास सांगितले.प्रत्यक्ष मारेकरी हे घटनेच्या वेळी आणि नंतर विष्णू चाटे आणि कराड याच्या कायम संपर्कात होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने आता ही सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे.