Satara Priyanka Mohite : मोहीम फत्ते..! साताऱ्याच्या प्रियंका मोहितेनं कांचनगंगा शिखरावर फडकवला तिरंगा

प्रियंकाने आधीही विविध पर्वत शिखरांवर यशस्वी चढाई करत देशाची मान उंचावली होती. 16 एप्रिल 2021ला अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली होती. ही देखील मोहीम पार करणारी पहिली भारतीय महिला म्हणून तिची ओळख आहे.

Satara Priyanka Mohite : मोहीम फत्ते..! साताऱ्याच्या प्रियंका मोहितेनं कांचनगंगा शिखरावर फडकवला तिरंगा
कांचनगंगा शिखर सर करणारी प्रियंका मोहिते आपल्या सहकाऱ्यांसह
Image Credit source: tv9
| Updated on: May 06, 2022 | 9:46 AM

सातारा : साताऱ्यातील प्रियंका मोहिते (Priyanka Mohite) या 30 वर्षे वयाच्या गिर्यारोहक तरुणीने जगातील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचे सिक्कीम येथील कांचनगंगा (Kanchanganga) शिखर सर केले आहे. कांचनगंगा या खडतर पर्वत शिखरावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने केला आहे. हा विक्रम करणारी प्रियंका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. प्रियांकाने गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी कांचनगंगा शिखर सर करण्याची मोहीम फत्ते केली असून तिच्या यशस्वी मोहिमेनंतर कुटुंबीयांनी साताऱ्यात आनंद व्यक्त केला आहे. या यशस्वी मोहिमेनंतर प्रियंका लवकरच मायदेशी परतणार आहे. प्रियंकाने केवळ कांचनगंगा हे शिखरच सर नाही केले तर याआधीच्या मोहिमाही तशाच खडतर पण यशस्वी राहिलेल्या आहेत. जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest), अन्नपूर्णा शिखर, किलिमंजारो, माउंट मकालू अशा पर्वतशिखरांवर चढाई केली.

आधीही केली होती विविध शिखरांवर यशस्वी चढाई

प्रियंकाने आधीही विविध पर्वत शिखरांवर यशस्वी चढाई करत देशाची मान उंचावली होती. 16 एप्रिल 2021ला अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली होती. ही देखील मोहीम पार करणारी पहिली भारतीय महिला म्हणून तिची ओळख आहे. अन्नपूर्णा हा पर्वत हिमालयाचा एक भाग असून तो नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 8 हजार फुटांपेक्षाही जास्त आहे. तिच्या या कामगिरीने तिचे कुटुंबीयही सुखावले आहेत. त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

माउंट एव्हरेस्टवर तिरंगा

प्रियंकाने 2013मध्ये जगातील सर्वाधिक उंचीच्या समजल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट पर्वताची चढाई केली होती. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची 8, 848.86 मीटर म्हणजेच 29,031.69 फूट इतकी असून ते नेपाळ व तिबेट या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. तर 2016मध्ये माऊंट किलिमंजारो आणि 2018मध्ये माउंट ल्होत्से, माउंट मकालूवरही चढाई करून अनेक विक्रम तिच्या नावे नोंदवले गेले आहेत.