Manoj Jarange: टोपी-तुरा अन् कंबरेला तंबाखूचा बटवा, बावनकुळेंवर जरागेंची हातवारे करत जहरी टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा धावता दौरा केला. या तीन दिवसात त्यांनी सोलापूर, सातारा, सांगली पिंजून काढला. अनेक ठिकाणी बैठका, सभा घेतल्या. दौरा आटोपता घेताना त्यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांवर जहरी टीका केली.

राम दखने, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र गेल्या तीन दिवसात पिंजून काढला. अनेक ठिकाणी बैठका आणि सभा घेतल्या. दौऱ्यापूर्वी अंतरवाली सराटीत त्यांची आक्रमकता दिसली. तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांची मवाळ भाषा दिसली. पण दौरा आटोपता घेताना त्यांच्या शब्दांना चांगली धार चढलेली दिसली. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कराडमधून सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. 29 ऑगस्ट रोजी होणार्या उपोषण आणि आंदोलनाची आठवण करून दिली. तर त्याचवेळी मराठे पुन्हा मुंबईत धडकतील हे सांगायला ते विसरले नाहीत.
बावनकुळे यांच्यावर जहरी टीका
मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जहरी टीका केली. बावनकुळे यांनी सर्वांच्या चौकशी केल्या तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल, बावनकुळे हेच ओरिजनल न्यायाधीश होऊ शकतात दुसरं कोणीही नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला. बावनकुळे यांना जर वकिलाचा झबला घातला तर लयच बेक्कार दिसतील, डोक्यावर टोपी तुरा आणि कंबरेला तंबाखूचा बटवा हा गडी चांगला दिसेल, अशी टोलेबाजी जरांगे यांनी हातवारे करत केली. मी लोकांच्या गाडीत बसतो तर हे माझ्याकडे बघतात मग यांच्याकडून गाड्या कुठून आल्या? निवडणुकीमध्ये उभा राहण्याच्यापूर्वी यांचं राजकारणात काय होतं हे शोधा, असा खोचक सवाल त्यांनी केला.
मराठा समाजावर अन्याय
गेल्या चार ते पाच दिवसात भयंकर मराठ्यांची लाट उसळल्याच पाहायला मिळालं, शेवटी मराठ्यांना कळालं की हे लोक आता आपल्यावर अन्याय करायला लागले आहेत. यालाच खरी जागृती आणि सावध राहणे असे म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. मराठी प्रचंड तुटून पडलेले आहेत, कारण इतका अन्याय मराठ्यांवर नाही करायचा, इतक्या द्वेषाच्या भावनेने मराठा समाजाकडे बघू नका, असे आवाहन त्यांनी केले.
तुम्हाला हे राज्य दूषित करायचं आहे. मात्र ते आम्हाला होऊ द्यायचं नाही. बावनकुळे, संजय शिरसाट हे दोन महान नेते झाले आहेत. मुख्यमंत्री यांना पाठबळ देत आहे,मुख्यमंत्री डायरेक्ट जातीवादावर उतरलेले आहेत जगात असा मुख्यमंत्री नसेल की जो जातीवादावर उतरलेला आहे, आपली उंची काय राज्याने आपल्याला किती मोठे पद दिले. मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेला सांगायला हवा की मराठ्यांवर बोलू नको, अशी टीका त्यांनी केली.
मग कसा तुम्हाला सन्मान देणार?
पंधरा वर्षांपूर्वी धनगरांना आरक्षण देतो म्हणाले होते. खोट्या गोष्टीवर पांघरून घालून लय दिवस चालत नसतं. आमची फसवणूक नाही तर यांनी सरळ सरळ XXC बसवला आहे. शेतकर्यांची फजिती केली. बंजारा समाजाचा वाटोळं करून टाकलं. तुमची वागणूक जर अशी असेल तर आमच्याकडून सन्मानाची अपेक्षा करता का? मी तुम्हाला सन्मान देणार नाही, अन्याय करणार्याचा सन्मान करू शकणार नाही, असे जरांगे म्हणाले.
मला अशी माहिती मिळाली की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या विरोधात पोस्ट टाका असं सांगितलं, म्हणजे बावनकुळे यांनी केलेलं पाप घेऊन निघेल असं मला कळत आहे, खोटं असेल तर माझे शब्द मागे घेईल. पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की भाजपचे जेवढे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात पोस्ट टाका, असा आरोप त्यांनी केला.
ट्रोल केलं तरी माझं काहीही वाकडं होत नाही आणि त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करणार आहे की त्यांनी चांगलं बोलावं म्हणून? मी लोकांच्या गाडीत बसतो तर हे माझ्याकडे बघतात मग यांच्याकडून गाड्या कुठून आल्या? निवडणुकीमध्ये उभा राहण्यापूर्वी यांचं राजकारणात काय होतं हे शोधा. तुमच्या पाठीशी कोणीही नव्हतं तर इतके पैसे, बंगले आणि शेती हे नेमके आले तरी कुठून असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एक संदेश घेण्यासारखा आहे तो म्हणजे आमचा समाज सुखी होऊच नये इतक्या जळणाऱ्या अवलादी आहेत, हे मराठ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. शेवटचं आंदोलन अंतरवालीतच होणार, पण काहीही सांगता येत नाही दाट शक्यता आहे मुंबईत घुसण्याची, कारण मराठे काही दम खाण्याच्या मार्गावर दिसत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.