आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने…; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं?

सायली सुर्वे छळ प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान, सायलीने स्वतः समोर येत आपल्या अपहरणाच्या अफवा फेटाळल्या असून तक्रार मागे घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर

आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने...; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं?
Sayali Surve
| Updated on: Apr 09, 2026 | 11:46 AM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरण गाजताना दिसत आहे. सायली सुर्वे लव्ह जिहाद आणि छळ प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर फरार असलेल्या आतिफला मुंबईतील कांदिवली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे स्वतः सायली सुर्वेने समोर येत आपल्या अपहरणाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

24 तासात काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मनोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आतिफ तासे हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर जमीन बळकावणे, फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले होते. यानंतर त्याला मुंबईतील कांदिवली भागातून शिताफीने ताब्यात घेतले. आतिफवर पिंपरी-चिंचवड आणि इतर भागांतही कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे नोंद आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सायली सुर्वे ही २०१९ ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी आहे. तिने घरच्यांचा प्रचंड विरोध असतानाही उद्योजक आतिफ तासे याच्याशी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर तिचे आयुष्य नरक बनले, असा दावा सायलीने केला होता. लग्नानंतर तिचे बळजबरीने धर्मांतर करून तिचे नाव ‘अतेझा’ ठेवण्यात आले. आतिफ आणि त्याच्या कुटुंबीयांकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. अखेर या त्रासाला कंटाळून सायलीने हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. त्यानंतर विधीवत होम-हवन आणि मंत्रोच्चाराद्वारे तिचे शुद्धीकरण करून तिची घरवापसी करण्यात आली. आता तिचे नवीन नाव अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले आहे.

पतीविरुद्धची तक्रार मागे

मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सायली सुर्वेचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यावर सायलीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. “माझं अपहरण झालेलं नाही, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करून मी पतीविरोधात दिलेली केस मागे घेतली आहे. प्रशासनाने आणि जनतेने माझ्याबद्दल जी काळजी दाखवली, त्याबद्दल मी आभारी आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका”, असे सायलीने तिच्या व्हिडीओत म्हटले आहे. सध्या सायली पुण्यात तिच्या घरी आहे. तिने हा निर्णय निस्वार्थ भावनेने घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, ती अद्याप पोलीस संरक्षणाखाली आहे.

घटस्फोट मिळवून देण्यासाठी यंत्रणेने काम करावे

दरम्यान या प्रकरणात भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी उडी घेतली असून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सायलीवर प्रचंड दबाव असून तिची मानसिक स्थिती ठीक नाही. आतिफसारख्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सायलीवर दबाव टाकण्यात आला असून तिची मानसिक अवस्था बिकट करण्यात आली होती. आतिफ तासेवर कठोर कारवाई व्हावी आणि सायलीला घटस्फोट मिळवून देण्यासाठी यंत्रणेने काम करावे, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

तसेच मी लवकरच राज्यातील अशा पीडित मुलींच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ नावाचा सेल आणि विशेष हेल्पलाइन सुरू करणार आहे. ज्याद्वारे मुलींना कायदेशीर मदत आणि समुपदेशन दिले जाईल, असेही मेधा कुलकर्णी यांनी जाहीर केले.

Follow Us