प्रकाश महाजन यांना अमित ठाकरेंचा फोन, दोघांमध्ये नेमकं संभाषण काय? इनसाईड स्टोरी समोर
मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाच्या शिबिरात आमंत्रित न केल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी त्यांना फोन करून समजावून सांगितले. महाजन यांनी पक्षात सुधारणा आणि काम करणाऱ्यांना मान मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. प्रकाश महाजन यांना इगतपुरी येथील पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी आमंत्रित न केल्याने त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मनसेत दिवाळी आहे, माझ्या घरात अंधार आहे,” अशा शब्दांत महाजन यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. देव बदलणार नाही, पण देवाने बोलावल्याशिवाय देवळात जाणार नाही,” अशी भूमिकाही प्रकाश महाजन यांनी मांडली होती. आता प्रकाश महाजन यांना मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश महाजन यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली.
प्रकाश महाजन यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित ठाकरेंचा फोन आल्याचे सांगितले. पक्षात सुधारणा व्हावी, काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी. पक्ष चालवताना प्रामणिक कार्यकर्त्याची अवहेलना होऊ नये, एवढाच माझा उद्देष होता, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.
हाच त्यामागील उद्देष
“मला काल रात्री आमचे युवा नेते अमित ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझी चौकशी केली. त्यांची थोडी नाराजी होती की मी आधी मीडियाकडे का गेलो नाही, ते माझ्याकडे आले होते. माझा थोडा भावनेचा बंध फुटला. पण त्या व्यक्तीने माझी इतके आस्थेवाईक पद्धतीने चौकशी केली मला या गोष्टीचे समाधान वाटलं आणि मानसिक आनंद झाला की इतक्या मोठ्या नेत्यांचे चिरंजीव असून त्यांनी मी तुम्हाला भेटायला येतो असे सांगितले. मला वाटतं की असे नव्या विचाराचे नेते जर असतील तर नक्की राजकारणात सभ्यतेचे आणि सज्जनतेचं पर्व सुरु होईल. ते माझ्या मुलापेक्षाही लहान आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही भेटायला येण्याची गरज नाही, मला बोलवा मी येतो. जे झालं ते चांगलं झालं नाही. पण पक्षात सुधारणा व्हावी, काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी, हाच त्यामागील उद्देष होता”, असे प्रकाश महाजन म्हणाले.
माझी नाराजी मी बोलून दाखवली
“बाळा नांदगावकर यांचाही फोन आला होता. त्यांच्याकडे मी माझ्या सर्व भावना बोलून दाखवल्या. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतल्या. आमची मैत्री आहे. पक्षात नसल्यापासून आमचे संबंध आहेत. मी त्यांना माझ्या भावना कळवल्या. माझा उद्देष गोंधळ करावा असा नव्हता. पक्ष चालवताना प्रामणिक कार्यकर्त्याची अवहेलना होऊ नये, एवढाच माझा उद्देष होता. माझी नाराजी मी बोलून दाखवली. मी देव बदलणार नाही. फरक इतकाच आहे की आता देवळात जाईल की नाही हे सांगता येणार नाही. पण देव बदलणार नाही. मी गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरुनच जाईन. अटल बिहारी वाजपेयीनंतर आवडलेला एकमेव राजकीय नेता म्हणजे राज ठाकरे”, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
