
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. त्यातच आता कल्याण आणि अंबरनाथ परिसरातून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. यात सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महात्मा फुले पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिपा बलून पठाण, मोनेरुल इस्लाम, रीमा सागर अहमद, सुमया अबुल कासिम, पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर, जोया जास्मिन मतदार आणि रॉकी रहीम बादशाह अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, सहा महिला आणि एक पुरुष संशयास्पद अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्रे सापडली. यानंतर तपासादरम्यान हे सर्वजण बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात आल्याचे समोर आले. रॉकी बादशाह हा या सहा महिलांना कल्याणमध्ये घेऊन आला होता. तो स्वतः गेल्या काही महिन्यांपासून कल्याणमध्ये वास्तव्याला होता.
या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रॉकी बादशाहने शिमा पठाण नावाच्या महिलेला अवघ्या १३ दिवसांत आधारकार्ड मिळवून दिले होते. हे आधारकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पोलीस या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि आधारकार्ड बनवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
दरम्यान हे सर्वजण कल्याण आणि अंबरनाथमधील शिवगंगा नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. कल्याण परिमंडळ ३ च्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर अंबरनाथमध्ये पाकिस्तानी नागरिक आणि हत्यारांबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र, डीसीपी सचिन गोरे यांनी या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सध्या या सर्व बांगलादेशी घुसखोरांना पुन्हा विमानाने बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण त्यांच्या हद्दीत येऊन कल्याण पोलिसांनी ही कारवाई केली. स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. पोलिसांनी आता हे घुसखोर ज्या घरात राहत होते, त्या घरमालकाने पोलिसांना भाडोत्र्यांची माहिती दिली होती का, याचीही चौकशी सुरू केली आहे.