भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट, भावाचा खळबळजनक खुलासा, म्हणाला जेव्हा ते…

शालार्थ आयडी प्रकरणात अशोक खरात यांचे बंधू दिलीप खरात यांनी आपली बाजू मांडली असून, आपल्यावर होणारे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट, भावाचा खळबळजनक खुलासा, म्हणाला जेव्हा ते...
Dilip Kharat Ashok Kharat
| Updated on: Mar 31, 2026 | 12:31 PM

नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सध्या याची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. आता या प्रकरणामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता त्याचे पडसाद शालार्थ आयडी प्रकरणापर्यंत पोहोचले आहेत. अशोक खरात यांचे बंधू दिलीप खरात यांचे या प्रकरणाशी नाव जोडले गेले आहेत. आता दिलीप खरात यांनी प्रथमच याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर होणारे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे आहेत, असे स्पष्टीकरण दिलीप खरात यांनी दिले आहे.

राजकीय दबावाचा किंवा गैरप्रकाराचा संबंध नाही

दिलीप खरात यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी अशोक खरातशी काहीही संपर्क नव्हता असा खुलासा केला आहे. मी २००९ पासून एका शिक्षण संस्थेत इमानदारीने कार्यरत आहे. आमच्या संस्थेला टप्प्याटप्प्याने २०२५ पर्यंत ६० टक्के अनुदान मिळाले आहे. सरकारी नियमांनुसार, ज्या संस्थांना २० टक्के अनुदान मिळते, त्यांना वेतनासाठी शालार्थ आयडी अनिवार्य असतो. माझ्या संस्थेला अनुदान मिळाल्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेतून मला शालार्थ आयडी प्राप्त झाला आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय दबावाचा किंवा गैरप्रकाराचा संबंध नाही, असे दिलीप खरात यांनी सांगितले.

आमचा कोणताही विशेष संपर्क नव्हता

मी केवळ अशोक खरात यांचे नातेवाईक असल्याने मला टार्गेट केले जात आहे. आम्ही एकाच कुटुंबातील असलो, तरी कौटुंबिक कार्यक्रम वगळता आमचा कोणताही विशेष संपर्क नव्हता. ते जेव्हा घर सोडून गेले, तेव्हा मी अत्यंत लहान होतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा इतर व्यवहारांबद्दल मला कोणतीही माहिती नाही. माझ्या शालार्थ आयडी प्रक्रियेत त्यांचा काडीचाही हस्तक्षेप नाही, असाही खुलासा दिलीप खरात यांनी केला आहे.

माझी केवळ पाच वर्षांची सेवा शिल्लक

माझी केवळ पाच वर्षांची सेवा शिल्लक आहे. जर मला खरोखरच चुकीच्या मार्गाने किंवा वशिलेबाजीने फायदा करून घ्यायचा असता, तर मी इतकी वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर संघर्ष केला नसता. माझी पत्नी एम.ए. बी.एड. असूनही ती आजही घरीच आहे. जर माझ्याकडे राजकीय वजन असते, तर मी तिलाही नोकरीला लावले असते. शालार्थ आयडी मिळवण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली आहेत, असेही दिलीप खरात यांनी म्हटले. दरम्यान या प्रकरणातील आरोपांमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

Follow Us