
Ajit Pawar And Sharad Pawar Meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी पक्षाची दोन शकलं झाली. आता अजित पवार यांचा गट सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा गट विरोधी बाकावर आहे. दरम्यान, पक्षाचे दोन तुकडे झालेले असले तरी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा भेट झाली आहे. त्यांच्या या भेटींची राज्याच्या राजकीय वर्तुळात वेळोवेळी चर्चादेखील झालेली आहे. दरम्यान, आता सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण एक तास चर्चा झाली आहे.
मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झालेली आहे. काक-पुतण्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झालेली आहे. या भेटीचे नेमके कारण काय असावे? असे विचारले जात आहे. असे असतानाच ही भेट माळेगाव सहकारी साखर कारखान्याविषयी होती, राज्यातील पूरस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या बैठकीत पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत किती पंचनामे झाले आहेत, अशी विचारणा शरद पवार यांनी अजित पवार यांना केल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनीदेखील शरद पवार यांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मतदतीबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासंदर्भातही या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांत काही कौटुंबिक विषयांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील ही पहिलीच भेट नाही. हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे एकत्र आलेले आहेत. काही कौटुंबिक कार्यक्रमातही हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर काका-पुतणे काही बैठकांसाठी एकत्र दिसले होते. परिणामी एकत्रिकरणाच्या या चर्चांना जास्तच बळ मिळाले होते. नंतर मात्र एकत्रिकरणाची ही चर्चा मागे पडली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक तास चर्चा झाली आहे.