Sharad Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पैशांसाठी शरद पवारांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन, किती कोटींचं देणं बाकी ?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसी व्यापाऱ्यांकडे 2 कोटी कांदा पेमेंट थकीत आहे. माजी कृषिमंत्री शरद पवारांनी यात पुढाकार घेतला. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तातडीने मिळावेत अशी विनंती केली.

Sharad Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पैशांसाठी शरद पवारांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन, किती कोटींचं देणं बाकी ?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 7:16 PM

रिपोर्टर – विक्रम वारे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे थकीत असलेले कांद्याचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी नानासाहेब बाबासो कळसकर, नवनाथ खशाबा थोरात, गोरख गणपत गदादे, गणेश गणपत गदादे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे कांदा विक्रीचे तब्बल 2,24, 95, 121 रुपयांचे पेमेंट थकीत आहे. याच गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कृषिभूषण प्रल्हाद वरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडे अडकलेले कांद्याचे पैसे मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

शरद पवारांचा थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना फोन

या शेतकऱ्यांची अडचण जाणून घेत शरद पवार यांनी तातडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पेमेंट कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे थकीत असल्याची माहिती देत, संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर याप्रकरणासंदर्भात शरद पवार यांनी डी. के. शिवकुमार यांना इंग्रजीत पत्रही पाठवलं.

शेतकऱ्यांना पैसे लवकर मिळवून देऊ, शिवकुमार यांचं आश्वासन

दरम्यान, नानासाहेब कळसकर यांच्यासह इतर शेतकरी बेंगळुरू येथील एपीएमसी मार्केटमध्ये गेले असता, त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये उपस्थित होते. या भेटीदरम्यान कळसकर यांनी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या थकीत कांदा पेमेंटसंदर्भात पाठविलेले पत्र मुख्यमंत्री शिवकुमार यांना प्रत्यक्ष दाखवलं. पत्राची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शेतकऱ्यांची अडचण गांभीर्याने समजून घेत, “तुमचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करू,” असं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे, या प्रश्नासंदर्भात शरद पवार यांनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे थकीत कांदा पेमेंट मिळवून देण्याची विनंती केली असल्याचेही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी यावेळी नमूद केलं.

कांद्याचे उत्पादन घेताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर पैसा, श्रम आणि वेळ गुंतवतो. हवामानापासून बाजारभावापर्यंत अनेक संकटांचा सामना करत शेतकरी आपला माल बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतो. मात्र, माल विकल्यानंतरही त्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम व्यापाऱ्यांकडे अडकून राहणे ही शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये आणखी भर घालणारी गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या कांद्याचा मोबदला हा त्यांचा हक्काचा पैसा आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम तातडीने वसूल करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची दखल घेत शरद पवार यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी सुरू झालेला या पाठपुराव्यामुळे त्यांच्या थकीत कांदा पेमेंटच्या प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us