देशात आर्थिक आणीबाणी येणार का? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार; सूचक उत्तराची चर्चा!
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर भाष्य केले. सोबतच त्यांनी देशात आर्थिक आणीबाणी येणार का? यावरही महत्त्वाचे भाष्य केले आहे.

Sharad Pawar : इराण-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतातही इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीने वागावे, असे आवाहन केले आहे. खुद्द मोदी यांच्याच गाड्यांचा ताफा कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीही आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेकांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. सर्वांनीच मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे मत व्यक्त केले जात आहे. असे असतानाच खासदार शरद पवार यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवून सर्वांना विश्वासात घ्यावे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी आर्थिक आणीबाणीवरही भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सध्या देशापुढे निर्माण झालेले संकट, इंधनाचा तुटवडा यावर भाष्य केले. परिस्थिती अशीच राहिली तर देशात भविष्यात आर्थिक आणीबाणी येईल का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, देशाच्या पंतप्रधानांनी जर काही सांगितले असेल तर नागरिकांनी त्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. लोकांनी सरकारच्या सुसंगत भूमिका घेतली आणि त्यात सातत्य ठेवल्यास तर आर्थिक आणीबाणीची वेळ कदाचित येणार नाही. पण त्याची काळजी घेतली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
एक-दोन दिवसांनी काहीही फरक पडणार नाही
तसेच, कोणी दुचाकीने प्रवास करतंय, कोणी पायी प्रवास करतंय मग तुम्ही या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार, असे पवार यांना विचारण्यात आले. याला उत्तर देताना आता हे किती दिवस चालणार हे माहिती नाही. हे फक्त एक किंवा दोन दिवसांसाठी असेल तर त्यात काहीही फरक पडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
यासह ज्या नेत्यांनी आपले ताफे सोडलेले आहेत त्यांनी त्यात सातत्य ठेवावे. देखावा करू नये. मोदी यांनी जे आवाहन केलेले आहे, त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही मत पवार यांनी व्यक्त केले.