त्यांच्यात राजकीय परिपक्वता…पार्थ पवारांवर बोलताना शरद पवार हसले, म्हणाले मीही आज…

काँग्रेसचा सध्या डाऊनफॉल सुरू झाला आहे, असे विधान पार्थ पवार यांनी केले होते. त्यावरच आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्मीतहास्य करत दिलेल्या या प्रतिक्रियेचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे, असेही पवार म्हणाले.

त्यांच्यात राजकीय परिपक्वता...पार्थ पवारांवर बोलताना शरद पवार हसले, म्हणाले मीही आज...
parth pawar and ajit pawar
Image Credit source: फेसबुक
| Updated on: Apr 06, 2026 | 6:07 PM

Sharad Pawar : सध्या राज्यात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी (सुनेत्रा पवार गट) पक्षाकडून प्रयत्न केले जात होते. राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांनी त्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. काँग्रेसने मात्र या जागेवर आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळेच आता बारामतीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी काँग्रेसला हिणवलं आहे. यावरच आता खासदार शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची सगळीकडे चर्चा होत आहे. शरद पवार यांनी स्मीतहास्य करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार नेमकं काय म्हणाले होते?

काँग्रेसने धनगर समाजातून येणारे आकाश मोरे यांना बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आकाश मोरे यांच्या नावाच्या घोषणेनंतर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर एका प्रकारे टीकाच केली आहे. “जशी वेळ येईल तसं सामारं जावं लागतं. आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही थांबवू शकत नाही. आम्ही निवडणुकीला सामोरे जावे. कोणालाही फोन करणार नाही. परंतु मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे,” अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी व्यक्त केली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

पार्थ पवार यांच्या या विधानाबाबत विचारले असता शरद पवार यांनी स्मीतहास्य करत प्रतिक्रिया दिली. “राजकारणात एक प्रकारची परिपक्वता लागते. ती पार्थ पवार यांच्यात कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही,” असं पवार म्हणाले आहेत. आता पवार यांना या विधानातून नेमकं काय सूचित करायचं होतं? असं विचारलं जात आहे. अनेकजण आपापल्या पद्धतीने या विधानाचा अर्थ लावत आहेत.

Follow Us