आजोबा आणि आत्याकडून लढवय्या रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारने मागे घेताच काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते त्यांनाही आता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य करताना रोहित पवारांचे कौतुक केले आहे.

आजोबा आणि आत्याकडून लढवय्या रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारने मागे घेताच काय म्हणाले शरद पवार?
Sharad Pawar and Rohit Pawar
Image Credit source: Google
| Updated on: Jul 10, 2026 | 11:23 PM

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते, त्यांना आपण 50 हजारांपर्यंत कर्जमाफी देऊ म्हटलं होतं, यामागे त्यांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तीन वर्षांपैकी दोन वर्ष ज्यांनी पैसे भरले आहेत, ते सर्व शेतकरी आता या योजनेसाठी पात्र होतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आता यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘सततच्या नैसर्गिक आपत्ती ,शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती परंतु सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2025-26 ,2026-27 चे पिककर्ज भरण्याची घातलेली अट यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता.

राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना त्यांचे नेते ,राजकिया पक्ष त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आ.रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन !

सुप्रिया सुळेंनी मानले सरकारचे आभार

सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करत म्हटले की, शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु मागील काही वर्षातील अतिवृष्टी दुष्काळ, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, वाढती महागाई, खते, औषधे, बियाणे यांचा वाढता खर्च अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची गरज असताना देखील शासनाने कर्जमाफी योजनेत जाचक अटी टाकल्या होत्या.

उशिरा का होईना सरकारने अखेर आज या जाचक अटी शर्ती काढण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार. या जाचक अटी काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडत आ.रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पंढरपूर ,छत्रपती संभाजीनगर येथे मोठे आंदोलन उभारले. छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनात मी स्वतः उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आणि सर्व शेतकरी संघटना ,राजकीय पक्षांनी एकजुटीने हा लढा लढला आणि जिंकला सुद्धा ,सर्वांचे अभिनंदन!

Follow Us