
आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं एक दिवसीय शिबीर नाशिकमध्ये पार पडलं, या शिबीरामध्ये बोलताना शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसीमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर मोठं वक्तव्य केलं आहे, तसेच यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे जाहीर भाषणात कान देखील टोचले आहेत.
महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करताना बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून बोलायची गरज नव्हती. सामाजिक ऐक्य साधणारा हा पक्ष आहे. हा पक्ष कुणा एकाचा नाही, असे म्हणत शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचले आहेत. लवकरच महाराष्ट्रात मी प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहे. तुम्ही देखील प्रत्येक तालुक्यात पोहचा असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं?
हैदराबाद गॅजेट यावर आधारित निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं. या गॅझेटमधे काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. व्हीजेएनटी बंजारा यांना आदिवासीच स्थान यामध्ये देण्यात आले आहे. आता बंजारा समाजाने मागणी सुरू केली आहे, काहीही झालं तरी चालेल पण आता आम्हाला आदिवासीमध्ये घेतलं पाहिजे. याचा अर्थ काय तर समाजासमाजामध्ये कटूता वाढेल असे निर्णय घेतले जात आहेत. बावनकुळे यांच्या नेतृत्वात ओबीसी समिती स्थापन करण्यात आली आहे. सगळे ओबीसी समितीत आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजासाठी जी समिती नेमण्यात आली तर त्यात महाजन सोडले तर सगळे मराठा आहेत. राज्य सरकारच्या कमिट्या कधी एका समाजाच्या करायच्या नसतात, असं म्हणत यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारला देखील खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आज केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. देशाचा नकाशा काढा, पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहेत. बांगलादेश उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने खस्ता खाल्ल्या होत्या तो आपल्या सोबत नाही, श्रीलंका आपल्या सोबत नाही. देशाची धुरा मोदी यांच्या हातात आहे. त्यांनी आता परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.