ऑफर आली तर विचार करू, शरद पवारांच्या खासदाराचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात एकच खळबळ!

पुणे-नाशिक रेल्वे होईल असे असेल, तर ही रेल्वे योजना विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून त्यांचं पक्षांतर करण्यासाठी आहे असा प्रश्न पडतो, अशी टाका अमोल कोल्हे यांनी केली.

ऑफर आली तर विचार करू, शरद पवारांच्या खासदाराचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात एकच खळबळ!
sharad pawar and amol kolhe
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 6:48 PM

Amol Kolhe : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंड केले आहे. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. ते आता विधानपरिषदेचे उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. ठाकरेंच्या पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे खासदारही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. शरद पवार यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. असे असतानाच पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. तसेच मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन, असंही ते म्हणाले आहेत.

…तर त्यात चुकीचे काय?

भविष्याच्या दृष्टीकोनात सध्या केंद्रात जाण्यासाठी राज्यात अनेक नेत्यांची नावे घेतली जातात. दिल्लीच्या वर्तुळातून अनेक नेत्यांकडे त्याच नजरेतून बघितले जाते. एखाद्या मराठी माणसाचे नाव इन्फ्रा मॅन म्हणून समोर येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे ना. भाजपाचे नेते नितीन गडकरी यांचे नाव दिल्लीत एका वेगळ्या आदराने घेतले जाते. तसेच नाव देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रा मॅन म्हणून घेतले जात असेल चांगली बाब आहे. एक राजकीय पक्ष ही भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ही भावना व्यक्त करत असेल तर त्यात चुकीचे काय, असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलंय.

लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून त्यांचं पक्षांतर करण्यासाठी…

तसेच, आतापर्यंत पक्षांतराची कोणतीही ऑफर मला आलेली नाही. अशी एखादी ऑफर आली तर त्याबाबत विचार करू, असंही ते म्हणाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलला तरच पुणे-नाशिक रेल्वे होईल असे असेल, तर ही रेल्वे योजना विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून त्यांचं पक्षांतर करण्यासाठी आहे असा प्रश्न पडतो, अशी टाकाही त्यांनी केली. विरोधी पक्षाचे आमदार, खासदार यांना निधी मिळत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण

ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर भविष्यात शरद पवार यांचे खासदारही पक्षांतर करू शकतात, असा दावा केला जात आहे. पवार यांचे खासदार फुटणार आहेत, असा दावा केला जात असला तरीही आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत, असे त्या पक्षातील वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. याच खासदार फुटीच्या दाव्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण आमची इतकी स्वच्छ भूमिका आहे. कुठल्याही वावड्या असतील, चर्चा असतील. याविषयी पवार साहेबांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे खासदार फुटीचा प्रश्नच उरत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Follow Us