राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, शरद पवारांची राष्ट्रवादी मोठ्या पक्षात होणार विलीन? आतली बातमी आली समोर
sharad pawar ncp news : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग आलाय. पक्ष कोणत्या पक्षात विलीन करायचा, यावरून आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

आमदार, खासदार फुटीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदेसेनेत गेले. खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असल्याचा दावा सत्ताधारी नेते करताना दिसत आहेत. खासदार फुटीमुळे ठाकरे बॅकफुटवर गेले आहेत. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा इतर पक्षात विलीन करण्यावरून आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटीच्या राजकारणानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पक्षात विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीला प्रस्ताव पाठवला होता. यामागे विरोधी पक्षाची ताकद वाढवण्याचा मानस असल्याचं बोलले जात आहे. यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी देखील अनुकूल असल्याचे बोललं जात होतं. परंतु 20 दिवसांतच पक्षातील आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांचं मत आहे की, काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर दुसरा आमदारांच्या गटाचं मत आहे की, थेट भाजपमध्ये विलीन व्हावं. मतदारसंघातील कामे होत नसल्यामुळे आमदारांची अडचण होत आहे, अशी भूमिका काही आमदारांनी मांडली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भूमिकेवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी तसाच प्रस्ताव हा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनाही पाठवला होता. ममता बॅनर्जी यांचेही आमदार आणि खासदारांनी फुटून सत्ताधाऱ्यांना साथ दिली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेदरम्यान ममता बॅनर्जी यांच्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्या. याबाबत ममता बॅनर्जी या 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनीही विरोधकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली येण्यावर भाष्य केलं होतं. त्यांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं होतं. परंतु आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने पक्षातील वरिष्ठांकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहावे लागेल.