Narhari Zirwal: शरद पवारांच्या डोक्यात माझ्याबाबतीत संशयाचं भूत नाही; नरहरी झिरवाळांनी जाहीर सभेत नेमकं काय सांगितलं?

Narhari Zirwal Speaks About His Equation With Sharad Pawar: शरद पवारांच्या मनात माझ्याबाबत संशयाचं भूत नाही, असं म्हणत नरहरी झिरवाळांनी मोठं विधान केले आहे. त्यांच्या विधानाची चर्चा होत आहे.

Narhari Zirwal: शरद पवारांच्या डोक्यात माझ्याबाबतीत संशयाचं भूत नाही; नरहरी झिरवाळांनी जाहीर सभेत नेमकं काय सांगितलं?
Narhari Zirwal Attends Sharad Pawar Faction's Event
| Updated on: Nov 21, 2026 | 7:40 PM

राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या मनात आपल्याबाबत कधीही संशय निर्माण होत नाही, असं वक्तव्य झिरवाळ यांनी जाहीर कार्यक्रमात केलं. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जलधारा गावात भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदिवासी समाजातील कार्यकर्ते जयंत वानोळे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं.

Loading...

नरहरी झिरवाळ म्हणाले की, माझ्या बाबतीत आदरणीय शरद पवार साहेबांच्या डोक्यात कधीही संशयाचं भूत राहत नाही. मी जिथे जातो तिथे प्लेन काम करतो, एवढाच मला नेहमी शेरा मिळतो आणि त्याच्यावरच मी खुश राहतो,’ असं नरहरी झिरवाळ म्हणाले. जयंत वानोळे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केलं. नरहरी झिरवाळ यांच्या या वक्तव्यामधून शरद पवार यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांचा आणि विश्वासाचा उल्लेख त्यांनी केला.

नरहरी झिरवाळ हे सध्या अजित पवार गटात आहेत. ते राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी केलेलं हे विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि विधानांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असतं. अशातच अजित पवार गटातील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यांच्याबद्दल विश्वासाचं विधान केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us