
Sharad Pawar : खासदार शरद पवार हे कसलेले आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय डावपेचांचा आवाका भल्याभल्यांना येत नाही. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीच धूम आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील अंदाज घेऊन युती आणि आघाड्यांचे गणित आखले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळेच या दोन्ही महानगरपालिकांसाठी अजित पवार यांनी केलेले बंड विसरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू होती. एकीकडे महापालिका निवडणुकीमुळे वातावरण तापलेले असतानाच बारामतीत एका कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार हे माझे मेंटॉर आहेत, असे जाहीर विधान केले. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने घडत असलेल्या घडामोडी आणि गौतम अदानी यांनी केलेले विधान या दोन्ही गोष्टींचा आधार घेत काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवार चंद्रपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना शरद पवार हे भविष्यात भाजपासोबत जातील का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तयांनी आजदेखील शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार अजितदादांच्या संपर्कात आहेत. दोन-चार लोक सोडले तर सगळे आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. नरेंद्र मोदी यांनादेखील आठ खासदारांची गरज आहे. त्यामुळे उद्योगपती अदानी यांनी एनडीए आणि शरद पवार यांच्यात समन्वय करायची भूमिका घेतली तर ते शक्य आहे का? अशी चर्चा महाराष्ट्रात असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
तसेच पुढे बोलताना, मला विचारलं तर शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची विचार करता शरद पवार यांची पुण्याबाबतची भूमिका ही तात्पुरती आहे. ते भाजपासोबत जातील असे मला अजिबात वाटत नाही, असे सांगत वडेट्टीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये युतीसाठी चर्चा चालू होती. पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पत्र एकत्र निवडणूक लढवणार आहेत. परंतु पुण्यामध्ये चर्चा फिस्कटली आहे. असे असतानाच विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानानंतर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.