
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत आहे. शरद पवार यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह नाही. शरद पवार गटात असणारे दोन माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह एक महिला प्रदेश सरचिटणीस यांचा आज अजित पवार गटात प्रवेश करत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची अर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन माजी मंत्री शरद पवार यांची साथ सोडत आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते अजित पवार यांच्या गटात जात आहे.
मुंबईत दुपारी दोन वाजता अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. प्रवेश सोहळ्यासाठी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगल कलश यात्रेच्या माध्यमातून शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचे मन वळवत शरद पवार यांना जोरदार झटका दिला आहे.
जळगाव, धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना गळाला लावण्यात आमदार अनिल पाटील यांना यश आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील पदाधिकारीसुद्धा शरद पवार यांची साथ सोडत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहे. उमेश पाटील यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे पाठवला आहे.