मोठी बातमी ! शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग, ठाकरे गटासह काँग्रेसमध्ये खळबळ, मोठा पक्षप्रवेश

Eknath Shinde : आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले आहे. नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोठी बातमी ! शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग, ठाकरे गटासह काँग्रेसमध्ये खळबळ, मोठा पक्षप्रवेश
Shiv Sena Incomming
Image Credit source: X
| Updated on: Dec 24, 2025 | 9:29 PM

महाराष्ट्रात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. सध्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले आहे. नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे, या पक्षप्रवेशाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नाशिक महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश सचिव राहुल अशोक दिवे, काँग्रेसच्या नगरसेविका आशा तडवी, ॲड.पूजा प्रवीण नवले, सुनील बोराडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, महेश खांडेकर, संभाजी काशीद तसेच राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रताप गणपत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका

यावेळी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खात होते, आता कोंबडीच कापून खाण्यासाठी एकत्र आले आहेत. लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात, शिवसेना भाजपची युतीने गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आहेत. आता मात्र जे एकत्र आले आहेत ते सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आले आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एकही शब्द नव्हता, मात्र आमच्याकडे सांगण्यासारखी भरपूर कामे आहेत. मुंबईत क्लस्टर पुनर्विकास, इमारतींना ओसी देणे, पागडीमुक्त मुंबई करणे, पुनर्विकास योजना, रस्ते काँक्रीटीकरण, एसटीपी प्लांट, मेट्रो प्रकल्प, कारशेड, आरोग्य सुविधा देण्याचे काम आम्ही केले आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री संजय शिरसाट, दादाजी भुसे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.