Shirdi : उत्तराखंडमधून आला, साईबाबांच्या चरणी माथा टेकताच अंध मुलाला दिसू लागलं, शिर्डीतील चमत्काराचा दावा काय?
उत्तराखंडमधील एका कुटुंबाने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा केला आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, अंनिसने (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) हा कथित चमत्कार फेटाळून लावला आहे. साईबाबांच्या नावाने चमत्काराऐवजी नेत्र रुग्णालये बंद करून अंधांना मंदिरात बरे करण्याचे अंनिसने शिर्डी संस्थानला आव्हान दिले असून, असे घडल्यास २१ लाखांचे पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे.

शिर्डी (Shirdi) येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर आमच्या अंध मुलाला दृष्टी मिळाली असा दावा केला जात आहे. उत्तराखंडमधील एका कुटुंबाने हा दावा केला आहे. मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं, मात्र साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुलाला दृष्टी मिळाली आणि त्या डोळ्यानेही दिसू लागलं असा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण या कथित चमत्काराला थारा देऊ नये असे म्हणत अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समितीने) यावर सवाल उपस्थित केले आहेत. साईबाबांच्या चमत्काराने दृष्टी येत असेल तर बाहेर असलेले नेत्र रूग्णालय बंद करावं आणि त्या दृष्टीहीने लोकांना थेट मंदिरात पाठवावं असं म्हणत अंनिसने हा कथित चमत्काराचा दावा फेटाळून लावला आहे.
काय आहे प्रकरण ?
शिर्डीत झालेल्या कथित चमत्काराबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडचं एक कुटुंब शिर्डीतील मंदिरात दर्शनासाठी आलं होतं. त्यांच्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं, पण आता त्याला दिसू लागलं आहे असा दावा केला जात आहे. ‘ माझ्या डोळ्यावर काही प्रकाश पडला, मी घाबरलो. पण माझ्या एका डोळ्यात दृष्टी नव्हती, काहीच दिसत नव्हतं. पण मी जेव्हा शिर्डीला आलो, तेव्हा मी साईबाबांच्या मूर्तीकडे पाहिले, माझ्या डोळ्यांवर प्रकाश आला, आता मला दिसू लागलं आहे’ असा दावा त्या मुलाने केला. जन्मापासूनच मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं, मात्र द्वारकामाईत आम्ही आलो आणि मुलाला दिसू लागलं, असा दावा त्या मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.
अंनिसने फेटाळून लावला चमत्काराचा दावा
याप्रकरणी अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समितीने) ने सवाल उपस्थित केले असून हा चमत्काराचा दावा फेटाळून लावला आहे. ” साईबाबांवरील श्रद्धेचा आदरपूर्वक सन्मान करून मी सांगू इच्छितो की दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जात आहे ही निखालसपणे अंधश्रद्धा आहे. याचं कारण म्हणजे, साईबाबा मंदिरापासून हाकेच्या अंतरावर नेत्र रुग्णालय आहे. त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन केले जाते, प्रत्यारोपण केले जाते आणि अंध व्यक्तींना दृष्टी दिली जाते. साईबाबांच्या चमत्काराने जर दृष्टी येत असेल तर संस्थांनी ते रुग्णालय बंद करावं आणि तिथे आलेल्या रुग्णांना मंदिरात पाठवावं, त्यांना दृष्टी मिळवून द्यावी असं आम्ही आव्हान करतो” असं अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
” किंवा अंध असलेले 5 भक्त आम्ही तुमच्याकडे देतो, त्यांना साईबाबांच्या चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी द्यावी. असं जर झालं आणि त्यांना दृष्टी मिळाली तर आम्ही 21 लाख रुपयांचं पारितोषिक संस्थानाला देऊ आणि आमची चळवळ बंद करू” असं आव्हानही अंनिसने दिलं.
