शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत

बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. अनेक मंत्र्यांनी बंगल्याच्या वाटपावरून खंत व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 23, 2024 | 8:19 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला तीन पक्ष मिळून केवळ 50 जागाच आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

अखेर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजपचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे मंत्रिपदं देखील पक्षाच्या वाट्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तुलनेत अधिक आले. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 19 तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. एकूण  39 मंत्र्यांपैकी 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्री आहेत.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील करण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना गृहमंत्रालयासाठी आग्रही होती, मात्र हे खातं भाजपकडेच ठेवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातंही ठेवण्यात आलं. याचाच अर्थ खाते वाटापातही भाजपचा दबदबा कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्रिपदापासून ते गृहखांत, महसूल खातं अशी अनेक खाते भाजपच्या मंत्र्यांना मिळाली. गृह खांत हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं, तर अजित पवार यांना अर्थ खांत आणि एकनाथ शिंदे यांना नगरविकास खांतं तसेच गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.

दरम्यान खाते वाटपानंतर आता नव्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप देखील करण्यात आलं. मात्र बंगल्याचं वाटप करत असताना भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहेत. तर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, प्रातप सरनाईक आणि भरत गोगावले यांना बंगल्याऐवजी फ्लॅटच वाटप करण्यात आलं आहे. फ्लॅट मिळाल्यामुळे मंत्र्यांनी खंत व्यक्त केली आहे. भाजपच्या मंत्र्यांना बंगले मिळाले तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मात्र फ्लॅट देण्यात आला आहे.