‘हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी’; शिवसेनेनं पुन्हा ठाकरे गटाला डिवचलं
उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाकडून एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे, सध्या या व्यंगचित्राची जोरदार चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वर्धापनदिन उद्या, गुरुवारी 19 जून रोजी वरळीत साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून, हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असे सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र समाज माध्यमावर पोस्ट केले आहे. शिवसेनेला विधानसभा निडवणुकीत भरघोस मते मिळाली. तर उद्धव ठाकरे गटाला अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे व्यंगचित्रांच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिन गुरूवारी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त वरळीतील एनएससीआय डोम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे महत्त्वाचे नेते शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट दोन्ही शिवसेनेसाठी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणांकडे सर्वांचं लक्षण असणार आहे.
मात्र त्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून एक व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असा मजकूर त्यावर नमूद करण्यात आला आहे. सोबतच शिवसेनेचा वाघ आणि सोबतच चालणारे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर भगवा ध्वज तसेच पाठीशी महाराष्ट्र दाखवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणात सांगत असतात. तोच आशय घेऊन हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असल्याचा आरोपही वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येतो. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी शिवसेनेकडून हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आल्याची चर्चा आहे.
