
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे टाला बसला असून, शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे, दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश केला आहे, यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या एबी फॉर्मसह अर्ज भरलेल्या वॉर्ड क्र. १ मधील मयूरी चव्हाण व वॉर्ड क्र. १३ मधील रेशंता सोनवणे या दोन महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपत प्रवेश केला आहे.
शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने, दुसरीकडे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना माघार घ्यायला लावून, त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच तालुकाप्रमुखांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकीकडे नेते व पदाधिकारी पळवापळवीवरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकारण तापले असतानाच आता जळगावच्या जामनेरात भाजपने सहकारी पक्षाचे उमेदवार आपल्या गळाला लावले आहेत, त्यामुळे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जळगावच्या जामनेर येथे नगरपालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नये, असं वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेलं असताना देखील असे प्रवेश होत असतील तर ते चुकीचं आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत पवार यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने दडपशाही करून, प्रलोभने देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावली, त्यानंतर त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. भाजपने आमचे उमेदवार आणि पदाधिकारी चोरले, त्यामुळे जाहिर निषेध करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.