शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ, कमळ घेतलं हाती

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराला वेग आला असून, पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश झाल्याचं पहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ, कमळ घेतलं हाती
उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 16, 2025 | 4:56 PM

राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, येत्या दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, दरम्यान त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता, त्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं, दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा सर्वात मोठी फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का भाजपने दिला आहे.

उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाच्या माजी महापौर विद्याताई निर्मले यांनी भाजपात प्रवेश केला आहे, विद्याताई निर्मले यांच्यासोबतच  शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शितल मंडारी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. भाजपने शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसला देखील धक्का दिला आहे.  काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी यांनी आणि  शिवसेना शिंदे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय जोशी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं या निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना भाजपचे उल्हासनगर प्रचार प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी म्हटलं की, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विद्याताई निर्मले आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी आणि त्यांच्या चिरंजीवांनी भाजपात प्रवेश केला आहे.  शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

दरम्यान या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना शितल मंडारी यांनी म्हटलं की, पक्षात गळचेपी होत नव्हती,  मात्र केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस यांचं सरकार आहे, दोन्ही सरकार चांगलं काम करत आहेत. कल्याण पूर्वेचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी मी भाजपात प्रवेश केला आहे.  माझी कोणावरही नाराजी नाहीये.