संजय राऊतांच्य दौऱ्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, पक्षाला खिंडार

मोठी बातमी समोर येत आहे, नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे, काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

संजय राऊतांच्य दौऱ्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, पक्षाला खिंडार
| Updated on: Jan 27, 2025 | 9:45 PM

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते, संजय राऊत यांचा दौरा आटोपताच नाशिकमधील तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक इंदुबाई नागरे, समीना मेमन यांच्यासह विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात महापालिका निवडणुका लागण्याचे संकते मिळत आहेत, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे आज मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजुल पटेल या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या होत्या. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेवक आहेत. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांच्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली होती, अखेर आज राजुल पटेल यांनी शिवेसनेत प्रवेश केला आहे.

पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही धक्का 

दरम्यान उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील धक्का बसला आहे. पुण्याच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला तर छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे उदय सामंत यांनी देखील मोठा दावा केला आहे. उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. शिवेसना ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संर्पकात आहेत, मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. तर  दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी देखील असाच दावा केला आहे.