मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाचा नारा? पुरंदर बंगल्यावर घडामोडींना वेग, तातडीची बैठक
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उपसभापती सचिन अहिर यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या पुरंदर बंगल्यामध्ये घडामोडींना वेग आला आहे. बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून, अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई बँक निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. मात्र ही निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार अशा काही बातम्या समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. उपसभापती सचिन अहिर यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या पुरंदर बंगल्यावर महायुतीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला महायुतीमधील प्रमुख नेते उपस्थित आहेत. उपसभापती सचिन अहिर, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर, सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांची या बैठकीला उपस्थिती आहे. मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जावी यावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीमध्ये लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
जागा वाटपाचा तीढा कायम
दरम्यान मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीमध्ये लढण्यावर जरी शिक्कामोर्तब झालं असलं तरी देखील जागा वाटपाचा तीढा अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे.
सातारा जिल्हा बँकेत भाजपला धक्का
दरम्यान दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. बँकेत सर्वाधिक सदस्य असताना सुद्धा मंत्री शंभुराज देसाई यांच्या एका खेळीमुळे भाजपची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी हुकली आहे. सातारा जिल्हा बँकेत एकून सदस्यांची संंख्या 21 इतकी आहे. बहुमतासाठी 12 मतांची आवश्यकता होती. भाजपकडे सर्वाधिक 9 सदस्य संख्या होती. शिवसेना शिंदे गटाकडे चार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 8 सदस्य होते. 12 सदस्यांची आवश्यकता असल्याने शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेना शिंदे गटाचे चार अशी सदस्य संख्या जुळवल्याने या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अध्यक्ष तर शिवसेना शिंदे गटाचा उपाध्यक्ष झाला. या निवडणुकीत भाजपची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी हुकली.